१०० बेडचे जम्बो कोविड सेंटर वडूज येथे सुरू होणार : प्रभाकर देशमुख 

  वडूज/डॉ. विनोद खाडे : गेल्या एक ते दीड महिन्यापासून खटाव तालुक्यात कोरोना रुग्णांना विटा, म्हसवड, सातारा यांसारख्या ठिकाणी जावं लागत असून, अशा रुग्णांसाठी खटाव तालुक्यात एक जम्बो कोविड सेंटर सुरू व्हावं म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सातत्याने मागणी करून त्यासाठी विशेष पाठपुरावा केला. त्यामुळे खटाव तालुक्यातील वडूज येथील ग्रामीण रूग्णालयाजवळ १०० बेडचे जम्बो कोविड सेंटर सुरू होणार असल्याचे माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

  वडूज येथील छत्रपती शिवाजी हायस्कूलमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेस नगराध्यक्ष सुनिल गोडसे, माजी नगराध्यक्ष डॉ. महेश गुरव, विपूल गोडसे, शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष पृथ्वीराज गोडसे, वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष मोरे, डॉ. संतोष देशमुख आदी उपस्थित होते.

  याबाबत अधिक माहिती सांगताना देशमुख यांनी सांगितले की, अमेरिका इंडिया फाऊंडेशन या सामाजिक संस्थेच्या मॉड्युलर
  हॉस्पिटल ॲन्ड फंडींगनुसार राज्यात १०० जम्बो कोविड सेंटर सुरू करण्यात येणार आहेत. सातारा जिल्ह्याचे कोविड सेंटर
  ग्रामीण भागात व्हावे अशी मागणी आपण स्वत: मुंबई येथे राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली. त्या मागणीची त्यांनी सकारात्मक पद्धतीने दखल घेतली. त्यानुसार सारा प्लास्ट कंपनीच्या वतीने वडूज येथील ग्रामीण रूग्णालयाच्या जागेची पाहणी करण्यात आली. यावेळी कंपनीच्या काही अधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग, विज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांशी वडूज येथील इन्फ्रास्ट्रक्चरच्या कामासंदर्भात चर्चा केली. हे अधिकारी जिल्हाधिकारी शेखरसिंह यांना लवकरच अहवाल देणार आहेत.

  त्याबाबत समन्वयक विनय अय्यर यांच्याशी आपली चर्चा झाली आहे. सदरचे कोविड सेंटर १०० बेडचे आहे. त्यामध्ये १६ बाय ४० लांबी रूंदीच्या सहा कंटेनरमध्ये हे कोविड सेंटर होणार आहे. यामध्ये ८४ ऑक्सिजन बेड तर १६ आयसीयू बेड असणार आहेत. याकामी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, पालकमंत्री बाळासाहेब पाटील तसेच जिल्ह्यातील इतर लोकप्रतिनिधी, राजकीय पक्षांचे पदाधिकारी यांचेही सहकार्य लाभल्याचे यावेळी देशमुख यांनी नमूद केले.

  सर्वस्वी श्रेय शरद पवार व अजित पवार यांचेच

  पत्रकार परिषदेत प्रभाकर देशमुख यांच्याबरोबरच रणजितसिंह देशमुख यांनी केलेल्या प्रयत्नाबाबत श्रेयवादासंदर्भात सोशल मीडियावर मेसेज फिरत असल्याबाबत पत्रकारांनी देशमुख यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, कोरोना उपाययोजना संदर्भात प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने प्रयत्न करीत असले तरी वडूज येथे होणाऱ्या जम्बो कोविड सेंटरचे खरे श्रेय शरद पवार, अजित पवार यांचेच आहे.