गडहिंग्लजच्या आप्पासाहेब नलावडे साखर कारखान्यात मुश्रीफांचा १०० कोटींचा घोटाळा ; सोमय्या यांचा आरोप

-उद्धव ठाकरे, अजित पवार, मुश्रीफांवर सोमय्यांचा घणाघात

  कराड : गडहिंग्लजच्या आप्पासाहेब नलावडे साखर कारखान्याशी मुश्रीफ यांचा काय संबंध आहे? असा सवाल करत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी या कारखान्यात हसन मुश्रीफ यांनी १०० कोटींचा घोटाळा केला आहे, असा गंभीर आरोप केला. मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात ईडीने कारवाई सुरू केल्याने माझ्यावर कारवाई करण्यात आली आहे. मुश्रीफ यांच्या घोटाळ्याचे पुरावे उद्या ईडीसह आयकर विभागाकडे देणार असल्याचे सांगत मुश्रीफ यांचा तिसरा घोटाळाही लवकरच उघडकीस आणणार असल्याचे किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

  दरम्यान, मुख्यमंंत्री उद्धव ठाकरे यांनी मला गैरकायदेशीर अडवून ठेवण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. नामदार हसन मुश्रीफ यांचे कोल्हापूर येथे आज आगमन होणार आहे. ते दवाखान्यात होते. त्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले आहेत. त्यात किरीट सोमय्या यांचा कोल्हापूर दौरा झाला तर दौऱ्यात गनिमी काव्याने हल्ला होऊ शकते, असे लेखी पत्र मला दिले. माझ्यावर हल्ला कोणा करणार? हसन मुश्रीफ यांचे कार्यकर्ते माझ्यावर हल्ला करणार होते. ते कोण गुंड आहेत का? असा संतप्त सवाल सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत केला.

  किरीट सोमय्या यांना कराड पोलिसांनी ओगलेवाडी रेल्वे स्थानकावर पहाटे ४ वाजता अटक केली. त्यांना ताब्यात घेऊन येथील शासकीय विश्रामगृहात आणण्यात आले. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, माजी जिल्हाध्यक्ष भरत पाटील, शहर अध्यक्ष एकनाथ बागडी यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

  किरीट सोमय्या म्हणाले, मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर मी जे आरोप केले आहेत. त्याची चौकशी सुरू झाली आहे. १२७ कोटी त्यांच्या कंपनीत कसे आले याचे उत्तर त्यांनी दिलेले नाही. मुश्रीफ परिवाराच्या सदस्यांच्या नावे फक्त २ कोटी रूपये आहेत. बाकीचा पैसा घोटाळ्याचा आहे. आप्पासाहेब नलावडे गडहिंग्लज कारखान्यात १०० कोटींचा घोटाळा केला आहे. या कारखान्याची कागदपत्रे उद्या ईडीकडे देणार आहे. २०२० मध्ये कोणतेही व्यवहार न होता हा कारखाना ब्रिक्स इंडियाला देण्यात आला. कोणताही दमडीचा अनूभव नसताना हा कारखाना त्यांना चालवायला देण्याचे कारण म्हणजे मुश्रीफ यांचे जावई या कंपनीत असल्याचा गौप्यस्फोट सोमय्या यांनी केला.

  घोटाळ्यास ठाकरे व पवार जबाबदार
  हे सरकार ठाकरे आणि पवार चालवतात. त्यामुळे हे या घोटाळ्याला जबाबदार आहेत. मला माझ्या मुलूंडच्या घरी स्थानबद्ध का करण्यात आले? हे अजुनही मला कळालेले नाही. मला कोल्हापूरला जाण्यावर बंदी का केली? जर माझ्यावर हल्ला होणार याची माहिती सरकारला असेल तर त्यांनी हल्ला करणारांवर कारवाई का केली नाही, असा सवालही सोमय्या यांनी उपस्थित केला.

  पारनेर,जरंडेश्वरची पाहणी करणार
  आता मी पारनेरच्या कारखान्याला भेट देणार आहे. त्या कारखान्यातही कोट्यावधींचा घोटाळा झाला आहे. ना. अजित पवार यांनी घेतलेल्या जरंडेश्वर कारखान्याची पाहणी करायला मी दि. ३० रोजी जाणार असल्याचे सोमय्या यांनी सांगितले.

  तक्रार करायला कागलला जाणार
  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची दडपशाही सुरू आहे. गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील हे सुद्धा या दडपशाहीला जबाबदार आहेत. सरसेनापती कारखाना कोल्हापूर हद्दीत असल्याने मला तिथेच तक्रार करावी लागणार आहे. हा घोटाळा काढण्यासाठी मला कोल्हापूरला जावे लागणार आहे. हसन मुश्रीफ यांच्या विरोधात कायदेशीर कार्यवाही सुरू करण्यासाठी मला कागल पोलीस स्टेशनला जावे लागणार असल्याचेही सोमय्या म्हणाले.

  मी दाव्यांना भीत नाही
  मंत्री मुश्रीफ हे मी केलेल्या घोटाळ्यांवर उत्तर देत नाहीत. ते शंभर कोटींच्या दाव्याची मला भिती दाखवत आहेत. मात्र त्यांच्या या दाव्यांना मी घाबरत नसल्याचे सोमय्या यांनी सांगितले.