रस्त्यासाठी ८३ वर्षीय योद्धा पुन्हा मैदानात; करणार धरणे आंदोलन

खटाव तालुक्यातील वडूज-पुसेगांव रस्त्याला जोडणार्‍या वाकेश्वर फाटा अ‍ॅप्रोच रस्त्याची दुरावस्था थांबवणे व रेखांकन बदलणे या मागणीसाठी वाकेश्वर येथील माजी सैनिक शंकर बंडू फडतरे हे प्रजासत्ताक दिनापासून तहसीलदार कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार आहेत.

    वडूज : खटाव तालुक्यातील वडूज-पुसेगांव रस्त्याला जोडणार्‍या वाकेश्वर फाटा अ‍ॅप्रोच रस्त्याची दुरावस्था थांबवणे व रेखांकन बदलणे या मागणीसाठी वाकेश्वर येथील माजी सैनिक शंकर बंडू फडतरे हे प्रजासत्ताक दिनापासून तहसीलदार कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार आहेत. या मागणीसाठी त्यांनी यापूर्वीही अनेकवेळा वेगवेगळी आंदोलने केली आहेत. आता वयाच्या ८३ व्या वर्षी त्यांनी पुन्हा मैदानात उतरण्याचा निर्धार केला.

    वाकेश्वर गावातून वडूज-पुसेगांव रस्त्याला जोडणार्‍या अ‍ॅप्रोच रस्त्याची गेली अनेक वर्षे अत्यंत दुरावस्था झाली आहे. या रस्त्यावरील खडी व डांबर पुर्णपणे उचकटले आहे. त्याचबरोबर रस्त्यात अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे तर काही ठिकाणी उंचवटा निर्माण होण्याबरोबर रस्त्याच्या दुतर्फा झाडे, झुडपे वाढली आहेत. रस्ता दुरावस्थेमुळे अपघात होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर फडतरे यांच्या स्वत:च्या गट नं. १५१ मधून मध्यभागी सदरचा अ‍ॅप्रोच रस्ता जात आहे.

    दोन्ही बाजूला शेती असल्याने आपल्या पिकांचे नुकसान होत आहे. त्याऐवजी सदरचा रस्ता पश्चिम बाजूच्या गट नं. १४५, ६९५ व १५० या जमीनीलगत करणे गरजेचे आहे. हे रेखांकन बदलण्यासंदर्भात ते गेली अनेक वर्षे अर्ज, विनंत्या करत आहे. मात्र, त्यास बांधकाम विभागाकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळला नाही. याच्या निषेधार्थ ते २६ जानेवारी या प्रजासत्ताक दिनी सकाळी दहापासून तहसीलदार कार्यालयाच्या आवारात धरणे आंदोलन करणार आहेत.