‘कृष्णे’साठी ९१ टक्के मतदान ; मतदानाचा टक्का वाढल्याने निकालाची उत्सुकता

एक जुलै रोजी कराड येथे वखार महामंडळाच्या गोदामात सकाळी आठपासून ७४ टेबलावर मतमोजणी होणार असून त्यासाठी सुमारे ३२५ अधिकाऱ्यांची यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतमोजणीसाठी फक्त प्राधिकृत केलेल्या मतमोजणी प्रतिनिधी व नियुक्त केलेल्या अधिकारी कर्मचारी यांनाच ओळखपत्र पाहून प्रवेश देण्यात येणार आहे.

  कराड : कृष्णा कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी मंगळवारी तब्बल ९१ टक्के मतदान झाले. चुरशीने झालेल्या लक्षवेधी प्रचार यंत्रणेनंतर प्रचाराचा टक्का वाढल्याने निकालाची प्रचंड उत्सुकता वाढली आहे. सत्तेच्या चाव्या काेणाकडे जाणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले अाहे.

  ३४५३२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. एकूण ४७१४५ मतदारांपैकी सुमारे नऊ हजार मतदार मयत असल्याने टक्केवारी कमी दिसत असली तरी प्रत्यक्षात हयात मतदार विचारात घेतल्यास सुमारे ९१ टकके मतदान झाले. सकाळपासूनच निवडणुक निरिक्षक आर. टी. शिंदे, निवडणूक निर्णय अधिकारी प्रकाश अष्टेकर, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मनोहर माळी, संजयकुमार सुद्रिक व जनार्दन शिंदे यांनी अनेक मतदान केंद्रावर भेटी देऊन निवडणूक प्रक्रिया निर्भयपणे व सुरळीतपणे होण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन केले. मतदानावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

  कर्मचाऱ्यांनी लिलया पेलले आव्हान
  अतिरिक्त पोलिस अधीक्षक, उपअधिक्षक, कार्यक्षेत्रातील सर्व पोलिस निरीक्षक यांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी ठिकठिकाणी भेटी देऊन आढावा घेतला. सर्व उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी व मतदान प्रतिनिधींनी शांततेत मतदान प्रक्रीया पार पाडण्यासाठी संयमी भूमिका घेतली. कोविडच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक होत असल्याने निवडणूक यंत्रणेसमोर मोठे आव्हान होते. परंतु सर्व मतदान अधिकारी कर्मचाऱ्यांनी स्वतः चा जीव धोक्यात असतानाही कोविड नियमांचे काटेकोर पालन करून मतदान केंद्रावर मतदारांना सुरक्षित व निर्भयपणे मतदान करणेसाठी चोख व्यवस्था केली. निवडणुकीसाठी सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील नियुक्त केलेल्या सुमारे १५०० कर्मचाऱ्यांनी निवडणूकीचे आव्हान लिलया पेलले.

  उद्या हाेणार मतमाेजणी
  एक जुलै रोजी कराड येथे वखार महामंडळाच्या गोदामात सकाळी आठपासून ७४ टेबलावर मतमोजणी होणार असून त्यासाठी सुमारे ३२५ अधिकाऱ्यांची यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतमोजणीसाठी फक्त प्राधिकृत केलेल्या मतमोजणी प्रतिनिधी व नियुक्त केलेल्या अधिकारी कर्मचारी यांनाच ओळखपत्र पाहून प्रवेश देण्यात येणार आहे. मतमोजणी केंद्रावर मोबाईल आणण्यास मनाई असल्याचे निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांनी सांगितले.