९६ वर्षीय आज्जींची अवघ्या दहा दिवसांत कोरोनावर मात

    वडूज/डॉ. विनोद खाडे : एखादी व्यक्ती कोरोनाबाधित झाली की मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या कमजोर बनते आणि अशातच जर कुटुंबातील व समाजातील लोकांनी हेळसांड केली तर परिस्थिती अवघड होते. मात्र, त्या व्यक्तीची मानसिकता जर मजबूत असेल आणि कुटुंबातील लोकांनी पाठबळ दिलं तर निश्चितच यश मिळते, याचं उत्तम उदाहरण म्हणजे एका ९६ वर्षांच्या आज्जींनी फक्त १० दिवसांत कोरोनावर मात केली.

    खटाव तालुक्यातील एनकूळ येथील गंगुबाई सोपान खाडे (वय ९६) या काही दिवसांपूर्वी कोरोनाबाधित झाल्या. त्याना तातडीने वडूज येथील निरामय हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. डॉ. अमित पाटील व डॉ. विराज जगदाळे यांनी आधुनिक तंत्रज्ञानाने योग्य उपचार केल्याने तर हॉस्पिटल स्टाफने योग्य काळजी घेतल्यानं फक्त १० दिवसांत गंगुबाई कोरोनामुक्त झाल्या. त्यांना डिस्चार्जही देण्यात आला. सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणारे, राष्ट्रीय युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष व स्वरा समूहाचे संस्थापक राजेंद्र खाडे यांच्या गंगुबाई या आज्जी असल्याने राजेंद्र यांनी अथक परिश्रम घेतले.

    ७ मुलं, ७ सुना, ९ नातू, ३ नात सुना, ९ नाती व ८ परतुंड एवढा मोठा परिवार असणाऱ्या गंगुबाई या एनकुळचे विद्यमान सरपंच महादेव खाडे व निवृत्त शासकीय ऑडीटर मधुकर खाडे यांच्या मातोश्री आहेत. दरम्यान, मजबूत शरीरयष्टी व प्रबळ इच्छाशक्ती च्या जोरावर या आज्जी कमी काळात कोरोनातून बऱ्या झाल्या हा इतर रुग्णांसाठी एक मोठा आदर्श च म्हणावा लागेल याबद्दल गंगुबाई खाडे यांच सर्वत्र कौतुक होत आहे.