भिरडाचीवाडी येथे बेवारस स्थितीत नवजात बाळ सापडले ; पोलिसांनी काही तासातच आरोपींना केले गजाआड

भुईंज पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष सहायक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे यांना याबाबत माहिती मिळाली की, भिरडाचीवाडी (ता. वाई) येथील धर्माच्या ओढया लगतच्या शिवारात दु. २.५० वाजण्याच्या सुमारास एक काही तासापूर्वी जन्म घेतलेले पूरूष जातीच्या बाळाला कोणीतरी अज्ञात लोकांनी तेथील झुडूपात बेवारसरित्या टाकून दिले आहे.

    वाई : वाई तालुक्यातील भुईंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणार्‍या भिरडाची वाडी येथील धर्माच्या ओढयाजवळ दि. २४ रोजी काही तासांपूर्वी जन्माला आलेले पुरूष जातीचे एक अर्भक झुडपात आढळून आले. हे बाळ अज्ञात व्यक्तीने तेथील झुडपामध्ये टाकून निघून गेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. नवजात बालक बेवारस परिस्थितीत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली होती. याबाबतची तक्रार भुईंज पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

    भुईंज पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष सहायक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे यांना याबाबत माहिती मिळाली की, भिरडाचीवाडी (ता. वाई) येथील धर्माच्या ओढया लगतच्या शिवारात दु. २.५० वाजण्याच्या सुमारास एक काही तासापूर्वी जन्म घेतलेले पूरूष जातीच्या बाळाला कोणीतरी अज्ञात लोकांनी तेथील झुडूपात बेवारसरित्या टाकून दिले आहे. घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे स्वतःसह आपला पोलीस फौजफाटा घेवून घटनास्थळी दाखल झाले. भिरडाचीवाडी येथे गेल्यानंतर त्यांनी काही तासापूर्वी जन्मलेल्या बाळास ताब्यात घेवून त्याला तातडीने भुईंज येथील प्राथमिक केंद्रात दाखल करून त्यावर योग्य असे औषधोपचार केले आणि तेथील उपस्थित डॉक्टरांच्या ताब्यात बालकाला सोपविले

    आजी आजोबांनीच टाकले झुडपात
    पोलिसांनी काही तासातच बाळाच्या आईला आणि बाळाला उघडयावर टाकून जाणार्‍या बाळाच्या आजी-आजोबांना तातडीने ताब्यात घेतले. या घटनेचा छडा लावत पोलिसांनी बापू दत्तू नवसूपे, अश्‍विनी बापू नवसूपे (सध्या रा. भुईंज किसन वीर कारखाना, मुळ रा. ब्रम्हगाव, आष्टी, जिल्हा बिड) यांना ताब्यात घेवून घडल्या प्रकाराची माहिती घेतली असता त्यांच्या तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीने अनैतिक संबंधातून या बाळास जन्म दिल्याची कबूली दिली.

    या घटनेची माहिती कारखान्यावर असणार्‍या व गावाकडील लोकांमध्ये चर्चा झाल्यास अब्रु जाईल या भितीपोटी त्यांनी या अर्भकास धर्माच्या ओढयाजवळील परिसरात झुडूपामध्ये या बाळाला नेवून टाकल्याची कबुली दिल्यामुळे त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. या गंभीर घटनेचा गुन्हा भुईंज पोलीस ठाण्यात दाखल झाला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक आर. एस. भंडारे करीत आहेत.