वाई तालुक्यातील वेळे गावच्या हद्दीत अपघात; पिंपोडेचा तरूण ठार

    भुईंज : पुणे-सातारा महामार्गावरील वेळे (ता. वाई) गावच्या हद्दीतील हॉटेल नॅशनलसमोर एका भरघाव वेगात आलेल्या मालट्रकची धडक बसून दूचाकीस्वार ठार झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला. अमोल शिवाजी पवार (वय ३०) या असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. तर दुचाकीवर पाठीमागे बसलेला मिथुन उत्तम पवार (वय २७) हा तरुण गंभीर जखमी झाला. या अपघाताची नोंद भुईंज पोलिस ठाण्यात झाली आहे.

    पिंपोडे (ता. कोरेगाव) येथील रहिवासी असलेले अमोल शिवाजी पवार आणि मिथुन उत्तम पवार दोघेजण शिरवळ (ता. खंडाळा) येथे मोलमजुरी करीत. गुरुवारी (दि. १८) दुपारी तीननच्या सुमारास अमोल आणि मिथून दुचाकीवरुन (एमएच ११ सीयू ८०८६) आपल्या मूळगावी पिंपोडेकडे पुणे सातारा महामार्गावरुन जात असताना वेळे (ता. वाई) गावच्या हद्दीत महामार्गालगत असणाऱ्या हॉटेल नॅशनलसमोर आली असता पाठीमागून भरघाव वेगात आलेल्या मालट्रकची (एमएच ४३ डीजी ९९१५) धडक बसली. यात अमोल पवार यांचा जागीच मृत्यू झाला तर मिथून पवार गंभीर जखमी झाले.