महाबळेश्वरमध्ये शासकीय जीपचा भीषण अपघात; दोन्ही टायर फुटले पण…

चालकाने तातडीने आपली जीप रस्त्याकडेला घेतली. तरीदेखील कारचालकाला वेगात असलेल्या कारचा वेग कमी करता न आल्यामुळे या कारने थेट शासकीय जीपला भीषण धडक दिली.

    वाई : महाबळेश्वर पंचायत समितीच्या शासकीय वाहनाला (जीप) महाबळेश्वर बाजूकडून भरधाव वेगात आलेल्या कारने जोराची धडक (Mahabaleshwar Accident) दिली. ही धडक इतकी भीषण होती की त्यामुळे जीपच्या बाजूचे दोन्हीही टायर फुटले. चालकाच्या दक्षतेमुळे जीवितहानी टळली.

    घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, महाबळेश्वर पंचायत समितीची शासकीय जीप (एम.एच. ११ ए.बी. ९६३) ही २२ रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास पाचगणी बाजूकडून पंचायत समितीचे विस्तार अधिकारी पार्टे यांना घेऊन महाबळेश्वरकडे जात होती. त्यावेळी त्यांची जीप मेटगुताड गावाच्या काही अंतरावर पुढे एका वळणावर आली असता त्यावेळी समोरुन प्रचंड भरधाव वेगात कार (एम.एच.१४ जे.ई.४८८९) ही येत असताना कारवरील चालकाचा ताबा सुटलाचे शासकीय वाहनावरील चालकाच्या हे लक्षात आले.

    त्यानंतर चालकाने तातडीने आपली जीप रस्त्याकडेला घेतली. तरीदेखील कारचालकाला वेगात असलेल्या कारचा वेग कमी करता न आल्यामुळे या कारने थेट शासकीय जीपला भीषण धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, जीपच्या बाजूचे पुढचा आणि मागच्या बाजूचे असे दोन्हीही टायर जागीच फुटले.

    दरम्यान, या अपघातावेळी चालक खामकर यांच्या प्रसंगावधानतेमुळे जीपमधील सर्वजण बचावले. या अपघातात दोन्हीही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अपघाताची माहिती महाबळेश्वर पंचायत समितीत समजताच तेथील सर्व अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.