तब्बल तीन महिन्यांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर म्हसवड शहर झाले अनलॉक

    म्हसवड : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे लॉकडाऊन झालेले म्हसवड शहर तब्बल ३ महिन्यानंतर सोमवारी (दि.२१) अनलॉक झाले. त्यामुळे शहरातील बाजारपेठ प्रदीर्घ काळानंतर गजबजलेली दिसून आली. तर व्यापारीवर्गातून याबाबत समाधान व्यक्त करण्यात आले.

    गेल्या ३ महिन्यांपासून म्हसवड शहरात लॉकडाऊन करण्यात आल्याने येथील सर्वसामान्य वर्गाचे व व्यापारी वर्गाचे अतोनात नुकसान झाले आहे. मात्र, शहरातील वाढती बाधितांची संख्या पाहून येथे प्रशासनाने जिल्हाधिकाऱ्यांच्या लॉकडाऊनच्या निर्णयापूर्वीच म्हसवड शहरात प्रांताधिकाऱ्यांनी लॉकडाऊन जाहीर केले होते. त्यामुळे सातारा जिल्ह्यात सर्वाधिक लॉकडाऊन म्हसवड शहरात सुरु होते. जवळपास तीन महिने हे लॉकडाऊन सुरु राहिल्याने शहराचे अर्थकारण कोलमडले होते. त्याला चालना देण्यासाठी शहर अनलॉक करावे, यासाठी शहरवासीय प्रयत्न करीत होते.

    यासाठी शहरातील व्यापाऱ्यांनी एकत्र येत येथील पालिकेसमोर आंदोलनही केले होते. त्या आंदोलनाची दखल घेऊन प्रशासनाने आठवड्यातून ३ दिवस शहर अनलॉक करण्याचे जाहीर केले. मात्र, त्याच दिवशी शहरात एकाच कुटुंबातील १७ जण बाधित सापडल्याने प्रशासनाने आपला निर्णय मागे घेत शहरातील लॉकडाऊन कायम ठेवले. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी २१ जूनपासून जिल्हा अनलॉक करण्याचे जाहीर केल्याने म्हसवड शहर अनलॉक होणार की नाही यावर शहरात चर्चा सुरु होती.

    जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा अनलॉक करण्याचे जाहीर केले असले तरी माण-खटावला प्रातांधिकाऱ्यांनी केले असल्याने येथील निर्णय हे प्रांताधिकारीच घेतील, असा सूर प्रशासनाकडून आवळला जाऊ लागल्याने सर्वांचे लक्ष हे प्रांताधिकाऱ्यांच्या निर्णयाकडे लागले होते. अखेर स्थानिक प्रशासनाने शहराची परिस्थिती पाहून निर्णय घ्यावा, असे प्रशासनाने कळवल्याने म्हसवड पालिकेने शहर अनलॉक करीत असल्याचे जाहीर केले. त्यामुळे शहरात २१ जूनला बाजारपेठ फुलून गेल्याचे चित्र दिसून आले.