वाई-पाचवड रस्त्यावर भाजपकडून महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी

    वाई : राज्यात सत्तेवर आलेल्या शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस यांच्या महाआघाडी सरकाराने ओबीसी समाजाची घोर फसवणूक केली असून, सरकारच्या बेफिकीरीमुळे ओबीसीचे राजकीय आरक्षण न्यायालयात तग धरू शकले नाही. पर्यायाने न्यायालयाने ओबीसी आरक्षण रद्दबातल ठरविण्यात आले. याचा निषेध व्यक्त करण्यासाठी वाई तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने शनिवारी सकाळी अकरा वाजता वाई-पाचवड रस्त्यावरील सह्याद्रीनगरच्या तिकाटण्यात चक्काजाम आंदोलन करण्यात आले.

    सह्याद्रीनगर तिकाटण्यात भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महाआघाडीच्या निषेधार्थ दोन तास आंदोलन केले. यावेळी ,उध्दवा अजब तुझे सरकार, असे म्हणत कार्यकर्त्यांनी महाआघाडी सरकारच्या निषेधाच्या घोषणा दिल्या, आरक्षण हे ओबीसी समाजाचे हक्काचे असल्याने त्यांना ते मिळणे आवश्यक असून, त्यामुळे या समाजाला स्थानिक संस्थांच्या निवडणुकीत मोठा फटका बसला आहे. विधानसभा निवडणूकीनंतर जनादेश डावलून सत्तेवर आलेल्या महाआघाडीच्या नेत्यांनी ओबीसी समाजाला दिलेल्या आश्वासनाचा विसर पडला आहे.

    यावेळी आंदोलनात आघाडी सरकारच्या धिक्काराच्या घोषणा देण्यात आल्या, चक्काजाम आंदोलानामुळे वाहनाच्या एक किलोमीटरच्या रांगा लागल्या होत्या, पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही, या आंदोलनात सातारा जिल्हा सरचिटणीस सचिन घाटगे, अविनाश फरांदे, आरपीआयचे अशोकराव गायकवाड, नगराध्यक्षा डॉ.प्रतिभा शिंदे,  राकेश फुले, मनोज कदम, श्रीकांत निकाळजे, यशवंत लेले, देवानंद शेलार, नगराध्यक्षा डॉ.प्रतिभा शिंदे,  शुभदा नागपूरकर, शम्मा इनामदार, मनीषा घैसास, यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.