ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी भाजपचे जिल्ह्यात चक्का जाम आंदोलन

  सातारा : सातारा जिल्ह्यात भाजपा जिल्हा कार्यकारिणीने जिल्ह्याच्या अकरा मंडलामध्ये ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी शनिवारी चक्का जाम आंदोलन केले. या आंदोलनाचा फटका महामार्गवरील वाहतुकीला बसला. सातारा पोलिसांनी जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलकांची जोरदार धरपकड केली.

  साताऱ्यातून जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर तर माणमधून आमदार जयकुमार गोरे यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. सातारा फलटण कराड वाई जावली खंडाळा येथे ठिकठिकाणी ओबीसी आरक्षणासाठी आंदोलकांनी घोषणाबाजी करत स्वतःला अटक करून घेतली. साताऱ्यात येथील बॉम्बे रेस्टॉरंट चौकात भाजपच्या सदस्यांनी जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर व राज्य कार्यकारिणी सदस्य भरत पाटील, विठ्ठल बलशेटवार, विकास गोसावी, किशोर पंडित यांनी या आंदोलनात भाग घेऊन मराठा व ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नांवर जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधले. सातारा कोरेगाव हा मार्ग पंधरा मिनिटासाठी रोखून ठेवण्यात आला. पोलिसांनी आंदोलनाच्या दरम्यान शंभर ते दीडशे जणांना ताब्यात घेतले. या आंदोलनाच्या वेळी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची अनुपस्थिती मात्र चर्चेचा विषय ठरली .

  महाविकास आघाडी सरकारने ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण संपुष्टात आणले, असा आरोप भाजपने केला आहे. त्यामुळे याचा निषेध म्हणून आज भाजपच्या वतीने चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे. राज्यातील सर्व ठिकाणी हे आंदोलन करण्यात आले.

  राज्य सरकारकडून पुरेसे पुरावे आणि बाजू न मांडता आल्याने आरक्षण हातातून गेलं असल्याचा आरोप भाजपने केला आहे. वेळकाढूपणा काढणाऱ्या सरकारला जाब विचारण्यासाठी आज भाजप राज्यव्यापी आंदोलन करणार असल्याचं भाजपकडून सांगण्यात आलं आहे.

  महाविकास आघाडी सरकारच्या चुकांमुळे सर्वोच्च न्यायालयाकडून ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाले, याचा निषेध करण्यासाठी आणि हे आरक्षण पुन्हा मिळण्यासाठी किमान एक हजार ठिकाणी चक्का जाम आंदोलन करणार असून पक्षाच्या प्रमुख नेत्यांसह एक लाख कार्यकर्ते अटक करून घेणार आहेत, असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

  ‘विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस नागपूर येथे, तर मी स्वतः कोल्हापूर येथील आंदोलनात सहभागी होणार आहे. तसेच भाजप केंद्रीय सचिव पंकजा मुंडे पुणे येथील आंदोलनात सहभागी होतील’, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.