महाबळेश्वरच्या अत्याचार प्रकरणावरून चित्रा वाघ आक्रमक; म्हणाल्या…

डाेंबिवली येथील सामूहिक अत्याचाराची घटना ताजी असताना सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना समाेर आली आहे.

    सातारा : डाेंबिवली येथील सामूहिक अत्याचाराची घटना ताजी असताना सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना समाेर आली आहे. या मुलीने बाळाला घरात जन्म दिल्यानंतर तिच्यावर झालेल्या सामुहिक अत्याचाराला वाचा फुटली आहे. संबंधित बाळास बेकायदेशीररित्या दत्तक देण्याच्या प्रक्रियेत सहभागी असलेल्या नऊ जणांवर संशयित म्हणून समावेश करण्यात आला आहे. या प्रकरणी शिवसेना स्थानिक नेत्याच्या दाेन मुलांसह एकूण ११ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यामध्ये दाेघे अटकेत आहेत.

    भाजपच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी महाबळेश्वर प्रकरणावर संताप व्यक्त केला आहे. त्या म्हणाल्या, महाबळेश्वरला अल्पवयीन मुलीवर गॅंगरेप झाला. त्यातून बाळ झाले. ते विकले. त्याचा गुन्हा दाखल झाला आहे. तेथील एका शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मुलास अटक केली आहे. या प्रकरणाचा पाेलिस तपास करीत आहेत. अरे काय अजून तपास सुरु आहे. ही शिवशाही आहे का असा प्रश्न वाघ यांनी उपस्थित केला आहे.

    दरम्यान, गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई (Shambhuraje Desai) यांनी महाबळेश्वरातील घटनेचा तपास याेग्य दिशेने सुरु असल्याचे सांगितले. ते म्हणाले, या प्रकरणात संबंधित आरोपी कोणत्या पक्षाचे आहेत हे बघायचे कोणतेही काम पोलिसांचे नाही. पाेलिसांनी संशयितांवर पाेक्साे अंतर्गत कारवाई केली आहे. त्यामुळे आरोपींना कठोरात कठोर शिक्षा होईल, अशा पद्धतीने गृह विभाग काम करत आहे.

    या प्रकरणात सनी उर्फ सत्वित दत्तात्रय बावळेकर आणि याेगेश दत्तात्रय बावळेकर यांच्यासह ११ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. दाेन्ही मुख्य संशयितांना २७ सप्टेंबरपर्यंत पाेलिस काेठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास करण्यासाठी महाबळेश्वर पाेलिसांचे पथक मुंबईस रवाना झाले आहे, अशी माहिती पाेलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी दिली.