सातारा जिल्ह्यात २६ जूनला भाजपचे चक्का जाम आंदोलन : जयकुमार गोरे

  सातारा : संपूर्ण देशात इतर मागासवर्गीयांच्या सवलती आबाधित असतानाही महाराष्ट्रात या प्रवर्गाचे राजकीय व पदोन्नतीचे आरक्षण रद्द झाले आहे. या आरक्षणाचा अनुभवजन्य तपशील (impirical data) सादर करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सूचना असताना राज्य सरकार मात्र सातत्याने टोलवाटोलवी करत आहे, अशी घणाघाती टीका आमदार जयकुमार गोरे यांनी पत्रकार परिषदेत केली .

  ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शाहू महाराज जयंतीनिमित्त २६ जून रोजी राज्यव्यापी चक्का जाम आंदोलनं करण्यात येणार आहे. सातारा जिल्ह्यात मंडलनिहाय ठिकठिकाणी रास्ता रोको करण्याचा इशारा आमदार गोरे यांनी दिला. जोपर्यंत ओबीसी प्रवर्गाचे आरक्षण प्रस्थापित होत नाही, तोपर्यंत राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ देणार नाही, अशी भूमिका भाजपच्या वतीने घेण्यात येणार असल्याचे गोरे यांनी स्पष्ट केले.

  इतर मागास प्रवर्गाच्या आरक्षणाच्या आंदोलन संदर्भात सातारा व सोलापूर जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांची बैठक माणचे जयकुमार गोरे यांनी शासकीय विश्रामगृहात घेतली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. ते पुढे म्हणाले, ओबीसी समाजाचे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील व पदोन्नतीचे आरक्षण रद्द झाले आहे. शिवाय मराठा समाजाचेही आरक्षण रद्द झाल्याने या दोन्ही समाजामध्ये प्रचंड असंतोष आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, या भूमिकेला आमचा ठाम पाठिंबा आहे. उत्तरेत काही राज्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत ओबीसी आरक्षण ५० टक्क्यांपेक्षा अधिक ठेवण्यास निवडणूक आयोगाने मान्यता दिली. या विरोधात कोर्टात जाणारे काही याचिकाकर्ते काँग्रेस पक्षाचे होते.

  ओबीसी प्रवर्गचे राजकीय व पदोन्नतीचे आरक्षण रद्द केले. तसेच महाराष्ट्रात राज्य सरकारने इतर मागासवर्गीय आरक्षणांचा जनगणनानिहाय तौलनिक तपशील सादर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने ३१ ऑगस्ट २०१९ रोजी दिले होते. दरम्यान, महाराष्ट्रात सत्ता पालट झाल्यावर ओबीसी प्रवर्गाचा अनुभवजन्य तपशील सादर करण्यासाठी काही महिन्यांचा कालावधी न्यायालयाकडे मागत राज्य सरकारने या प्रश्नांवर सातत्याने टोलवाटोलवी केली आहे. अद्याप राज्य मागासवर्गीय आयोगाची त्यांनी स्थापना केली नाही. महाविकास आघाडीच्या तीन पक्षात कोणावर कोणती जबाबदारी आहे हे समजत नाही.

  महाविकास आघाडीचे छगन भुजबळ ओबीसी आरक्षणासाठी आंदोलनाची भाषा करतात म्हणजेच राज्य सरकार भुजबळ यांचे सुद्धा ऐकत नाहीत. या प्रश्नावर राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शाहू महाराजांच्या जयंतीदिनी २६ जूनला भाजपचे राज्यव्यापी आंदोलन होणार असून, सातारा जिल्ह्यातही मंडल निहाय ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे, असा इशारा त्यांनी दिला.

  सरनाईकांच्या लेटरबॉम्बवर बोलणे टाळले

  शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या लेटरबॉम्बच्या अनुषंगाने राज्यात सत्तांतर होणार काय ? या प्रश्नावर आमदार गोरे यांनी प्रतिक्रिया दिली नाही. पालकमंत्री बाळासाहेब पाटील हे कोविडच्या आपत्कालीन परिस्थितीत कुठे होते? जिल्हाधिकारी शेखरसिंह यांनी सुध्दा आपत्कालीन परिस्थिती हाताळताना जबाबदार लोकप्रतिनिधी व्यापारी सामाजिक संस्थांना विचारात घ्यायला हवे होते. मात्र, त्यांनी तसे न केल्याने जिल्ह्याला नाहक रेड झोनमध्ये भरडावे लागले, अशी टीका त्यांनी केली .