तळदेव विभागात चार दिवसांपासून बीएसएनएलचं नेटवर्क ‘नॉट रिचेबल’

  केळघर/नारायण जाधव : महाबळेश्वर तालुक्यातील दुर्गम तळदेव विभागात गेल्या चार दिवसांपासून बीएसएनएल ची रेंज गायब झाल्याने परिसरातील मांघर ते वाघेरा दरम्यानच्या २५ ते ३० गावांतील ग्रामस्थांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत असून, बीएसएनएलच्या भोंगळ कारभाराबाबत नाराजी व्यक्त होत आहे. एकीकडे खासगी कंपन्या ग्राहकांना उत्तम सेवा देत असताना बीएसएनएल ग्राहकांना का चांगली सेवा देऊ शकत नाही, असा सवाल विचारला जात आहे.

  महाबळेश्वर तालुक्यातील तळदेव हा दुर्गम विभाग असून, तापोळा विभागाला महाबळेश्वर विभागाशी हा विभाग जोडण्याचे काम करतो. तळदेव येथे बाजारपेठ असून, विभागातील ग्रामस्थांची येथे नेहमी वर्दळ असते. गेल्या चार दिवसांपासून या विभागातील २५ गावांतील ग्रामस्थांना बीएसएनएलची रेंज नसल्याने नाहक मनस्ताप सहन करावा लागतो आहे. तळदेव विभागात प्रामुख्याने बीएसएनएललाच रेंज आहे. त्यामुळे अनेकांनी बीएसएनएलची सिम कार्ड घेतली होती. वारंवार बीएसएनएलची रेंज गायब होत असल्याने व्यावसायिक व स्थानिक ग्रामस्थ, महाविद्यालयीन युवक, विद्यार्थ्यांना समस्या जाणवत असून, रेंज नसल्याने ऑनलाईन अभ्यासक्रम थांबत आहे.

  तक्रार देऊनही दखल नाहीच

  वीज गेल्यावर तर रेंज जातेच त्याचबरोबर वीज असताना ही रेंज नसते. वारंवार तक्रारी करून देखील बीएसएनएल तक्रारींची दखल घेत नसल्याने स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. बीएसएनएलने कारभारात सुधारणा करावी, अशी मागणी तळदेव येथील दिनेश जंगम, विकास जाधव, किशोर जंगम, रवी अंभोरे, तुषार जंगम यांनी केली.

  …तर जनआंदोलन करणार

  बीएसएनएलची रेंज तळदेव विभागात वारंवार गायब होत असून, तक्रारी करूनही ग्राहकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केले जात आहे. कारभारात सुधारणा न झाल्यास जनतेला जनआंदोलन उभे करावे लागेल, असे सामाजिक कार्यकर्ते अंकुश जंगम यांनी सांगितले.