त्रिशंकू भागातील सर्वप्रकारच्या समस्या सातत्याने सोडवल्या : शिवेंद्रसिंहराजे भोसले

    सातारा : आमदार फंडासह शासनाच्या विविध योजनांमधून निधी उपलब्ध करून त्रिशंकू भागात सातत्याने विविध प्रकारची विकासकामे मार्गी लावली आहेत. त्रिशंकू भागात प्रत्येक कॉलनी, नगर, वसाहत येथील अंतर्गत रस्ते मार्गी लावले. पूर्वीपासूनच या भागावर विशेष लक्ष केंद्रित करून या भागातील सर्व प्रकारच्या समस्या सातत्याने सोडवल्या आणि यापुढेही सोडवू, असे आश्वासन आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिले.

    शिवेंद्रसिंहराजे यांच्या विशेष प्रयत्नातून विसावा नाका येथील विसावा पार्कमधील अंतर्गत रस्त्यासाठी आमदारांचा स्थानिक विकास कार्यक्रम या योजनेतून १२ लाख ७५ हजार रुपये निधी मंजूर झाला. या रस्त्यांच्या खडीकरण, डांबरीकरणाचा शुभारंभ शिवेंद्रसिंहराजे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

    यावेळी शिवाजी ढाणे, विलास पवार, डॉ. दीपक निकम, ऍड. संजय भोसले, डॉ. अमोल ढवळे, दत्ताजी भोसले, ओंकार तिखे, हरेश दोशी, यतीन दोशी, ईशान दोशी, राजन पोरे, संजय निकम, सावंत, प्रसाद कुलकर्णी, एस. एन. कुलकर्णी यांच्यासह इतर उपस्थित होते.

    सातारा पालिका अथवा ग्रामपंचायत हद्दीत समाविष्ट नसल्याने त्रिशंकू भागातील विकासकामांसाठी निधी मिळवण्यासाठी नेहमीच अडचणी यायच्या. मात्र, सर्वप्रकारच्या अडचणींवर मात करून त्रिशंकू भागासाठी निधी उपलब्ध करून दिला आणि विविध प्रकारची विकासकामे सातत्याने मार्गी लावली.

    हद्दवाढ झाली तरच त्रिशंकू भागाचा विकास होणार आहे. या दूरदृष्टीतून सातारा पालिकेचा हद्दवाढीचा प्रस्ताव उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहकार्याने मंजूर करून घेतला. आता त्रिशंकू भाग पालिका हद्दीत आल्याने या भागातील मूलभूत सुविधांसह सर्व प्रकारच्या समस्या सोडवू आणि खऱ्या अर्थाने या भागाचा कायापालट करुं, असा शब्द आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी यावेळी दिला.