देशभक्ती व देशसेवेत कराडच्या भूमीचे योगदान – संग्रामसिंह तोमर

शौर्याजंली यात्रेचे कराडमध्ये जंगी स्वागत

    कराड : १९७१ बांगला मुक्ती संग्रामातील जवानांसाठी व शहिद जवानांच्या स्मरणार्थ जयहिंद फौंडेशनच्यावतीने संपूर्ण देशभर शौर्याजंली यात्रा सुरू करण्यात आली आहे. या शौर्ययात्रेचे कराड शाखेच्यावतीने छत्रपती शिवाजी उद्यानात जंगी स्वागत करण्यात आले. दरम्यान, देशभक्ती व देशसेवेत कराडच्या भुमीचे योगदान असल्याचे गौरवोद्गार
    शौर्ययात्रेचे प्रमुख संग्रामसिंह तोमर यांनी काढले.

    याप्रसंगी, शौर्ययात्रेच्या प्रमुख मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. तर कराड तालुक्यातील विरमाता व विरपत्नींचा संग्रामसिंह तोमर यांच्यासह हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी आदर्श शिक्षक दत्तात्रय पवार (गुरुजी), वृक्षमित्र चंद्रकांत जाधव, प्रा. भगवान खोत, तेजस पवार, सातारा व वाई शाखेचे मकरंद देशमुख, वैभव कदम, अशोक चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.

    संग्रामसिंह तोमर म्हणाले, कराड ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची भूमी आहे. तसेच देशाचे संरक्षणमंत्री व महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणसाहेबांचे हे गाव आहे. स्वच्छ शहर, परिसर व येथील सर्व सोयी-सुविधा पाहून आमची शौर्य यात्रा यशस्वी झाल्याचा अभिमान व आनंद वाटतो. अनेक राज्यांतून शौर्य यात्रेची वाटचाल सुरू असून विविध ठिकाणी आमचे स्वागत करण्यात आले. परंतु, कराडमध्ये आमचे मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्वागत व सन्मान करण्यात आला. त्यामुळे आम्ही खूप प्रभावित झालो आहोत. त्यातून आपले सैनिकांच्याबाबत आदर व प्रेम दिसून आले. तसेच विरमाता, विरपत्नी व जवानांचा सत्कार करताना आपली देशभक्ती व देशसेवेसाठी या भुमीचे मोठे योगदान असून त्यामुळे आम्ही प्रभावीत झालो असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

    दरम्यान, विजय दिवस समारोह समितीचे सहसचिव विलासराव जाधव यांनी विजय दिवस समारोह समितीच्यावतीने कराडमध्ये देशातील एकमेव विजय दिवस साजरा केला जात असून त्याबाबतची माहिती दिली. तसेच ऋतुराज शहा यांनी विजय दिवस व कराडचे ऐतिहासिक, भौगोलिक, सांस्कृतिक व राजकीय महत्व सांगितले. घारे-पाटील यांनी सातारा जिल्हा हा सैनिकांचा जिल्हा म्हणून ओळखला जात असून त्याविषयी माहिती पाहुण्यांना दिली.

    स्वागत वर्षाराणी पवार यांनी केले. मनिषा यादव व स्वाती पाटील यांनी सूत्रसंचालन केले. आभार वर्षाराणी पवार यांनी मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.