कायम हसमुख असणाऱ्या दीपालीची आत्महत्या…विश्वास बसत नाही ;  उमद्या अधिकाऱ्याच्या मृत्यूने सातारा हळहळला

दीपाली चव्हाण यांचे पती अमरावतीला अन्य विभागात कार्यरत आहेत. स्वभावाने हसमुख व आधुनिक विचारांच्या दिपाली आत्महत्या करुच शकत नाही, असे दीपाली चव्हाणच्या नातेवाइकांचे म्हणणे आहे. दीपाली मूळच्या साताऱ्याच्या होत्या. येथील नातेवाईकांना तिच्या आत्महत्येच्या बातमीने धक्का बसला असून दीपाली असे काही करेल यावर विश्वास बसत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे

    सातारा: हरिसाल व्याघ्र प्रकल्पातील सिपना वन्यजीव विभागाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी गुरुवारी (ता. २५) सायंकाळी ७ वाजता हरिसाल येथील सरकारी बंगल्यात स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. वरिष्ठ अधिकार्‍यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दीपाली चव्हाण यांच्या सुसाइड नोटमध्ये काही वरीष्ठ अधिकार्‍यांच्या नावाचा उल्लेख केला आहे.

    धारणी तालुक्यातील हरिसाल येथे व्याघ्र प्रकल्पाच्या शासकीय घरात दिपाली चव्हाणचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली. त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी सुसाइड नोट लिहिल्याची माहिती समोर आली आहे.दीपाली चव्हाण यांनी अपर प्रधान मुख्य वन संरक्षक रेड्डी यांच्या नावाने लिहिलेल्या चार पानांची सुसाइड नोट सापडली. त्यातून उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार हेच दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येस जबाबदार असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. चव्हाण यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची माहिती धारणीचे पोलिस निरीक्षक शुभम कुलकर्णी यांनी सांगितले. तपास सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

    दीपाली चव्हाण यांचे पती अमरावतीला अन्य विभागात कार्यरत आहेत. स्वभावाने हसमुख व आधुनिक विचारांच्या दिपाली आत्महत्या करुच शकत नाही, असे दीपाली चव्हाणच्या नातेवाइकांचे म्हणणे आहे. दीपाली मूळच्या साताऱ्याच्या होत्या. येथील नातेवाईकांना तिच्या आत्महत्येच्या बातमीने धक्का बसला असून दीपाली असे काही करेल यावर विश्वास बसत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.दिपाली यांच्या आत्महत्येच्या वृत्ताने साताऱ्यातील पर्यावरण प्रेमींना धक्का बसला आहे . या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र चौकशी होण्याची मागणी साताऱ्याचे मानद वन्यजीवरक्षक सुनील भोईटे यांनी केली आहे .