साताऱ्यात शेतकरी संघटना व काँग्रेसची निदर्शने; शेतकरी विरोधातील कृषी विधेयकांचा निषेध

    सातारा : देशातील जनतेला खोटी आश्वासने देऊन सत्तेत आलेल्या भाजपाच्या हुकूमशाही राजवटीने देश अडचणीत आला आहे. शेतकरी विरोधी काळ्या कायद्यांनी बळीराजा संपला आहे. देशाची आर्थिक स्थिती ढासळली आहे. हे कायदे मागे घेण्यासाठी गेली 11 महिने नवी दिल्लीमध्ये आंदोलन करत आहेत. त्याच्या निषेधार्थ देशातील सर्व शेतकरी संघटना, डाव्या आघाड्यांनी तीव्र आवाज उठवला असून, त्याचाच एक भाग म्हणून सोमवारी (दि. 27) भारत बंदची हाक दिली. यात साताऱ्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला असून, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.

    गेली सात वर्षे केंद्रात सत्तेत असलेल्या नरेंद्र मोदी यांच्या सरकारने देशाचे वाटोळे केले आहे. अर्थव्यवस्था पुरती ढासळून गेली आहे. अकरा महिने सुरु असलेल्या आंदोलनाची चेष्टा केली जात आहे. आंदोलकांच्या रस्त्यावर खिळे मारले जात आहे. या सरकारचा निषेध करत म्हणून सोमवारी विविध संघटनांनी भारत बंदची हाक दिली. या आंदोलनात सातारा जिल्हा काँग्रेस, किसान सभा, संयुक्त किसान मोर्चासह विविध संघटना सहभागी झाल्या होत्या. पोवई नाका येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. शेतकऱ्यांच्या विरोधातील तीनही जुलमी काळ्या कायदद्यांचा यावेळी विरोध करण्यात येणार आला.

    दिल्लीमध्ये गेल्या अकरा महिन्यांपासून सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनास पाठिंबा देण्यात आला. कामगारांना देशोधडीला लावणाऱ्या , त्यांचे संसार बरबाद करणाऱ्यांचा आणि देशातील तरुणाईला बेरोजगारीच्या खाईत रोवणाऱ्या, इंधन दरवाढ तसेच जीवनावश्यक वस्तूंची कृत्रिम टंचाई करणाऱ्या केंद्र सरकारचा यावेळी जोरदार निषेध करण्यात आला.