मंगळवार तळ्यातून पालिकेने काढले ट्रॉलीभर मृत मासे

मंगळवार तळ्यात परिसरातील नागरिकांकडून कचरा व निर्माल्य टाकले जाते. असे प्रकार सातत्याने घडत असून, तळ्यातील पाणी दूषित होत आहे. या दूषित पाण्यामुळे तळ्यातील मासे मृत्यूमुखी पडल्याचे मंगळवारी काही नागरिकांच्या निदर्शनास आले.

    सातारा : मंगळवार तळ्यातील मासे मृत्यूमुखी पडल्याची घटना उघडकीस येताच पालिकेच्या आरोग्य पथकाकडून गुरुवारी सकाळी तळ्याची स्वच्छता करण्यात आली. या तळ्यातून जवळपास ट्रॉलीभर मृत मासे बाहेर काढण्यात आले. अनेक दिवसांपासून दुर्गंधीने त्रस्त झालेल्या नागरिकांना देखील स्वच्छतेमुुळे दिलासा मिळाला.

    मंगळवार तळ्यात परिसरातील नागरिकांकडून कचरा व निर्माल्य टाकले जाते. असे प्रकार सातत्याने घडत असून, तळ्यातील पाणी दूषित होत आहे. या दूषित पाण्यामुळे तळ्यातील मासे मृत्यूमुखी पडल्याचे मंगळवारी काही नागरिकांच्या निदर्शनास आले. बुधवारी दुसऱ्या दिवशी देखील पाण्यावर मासे मोठ्या प्रमाणात तरंगताना दिसून आले. मासे मृत्यूमुखी पडण्याचा प्रकार वारंवार घडू लागल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले.

    दरम्यान, हा प्रकार उघडकीस येताच गुरुवारी सकाळी पालिकेच्या आरोग्य पथकाने तळ्यावर स्वच्छता मोहीम राबविली. पाण्यातून जवळपास ट्रॉलीभर मृत मासे बाहेर काढून त्याची सोनगाव कचरा डेपोत विल्हेवाट लावण्यात आली.

    उपसा करून तळे स्वच्छ करा…

    २०१४ रोजी तळ्यातील मासे मोठ्या प्रमाणात मृत्यूमुखी पडले होते. त्यावेळी संपूर्ण तळ्याची स्वच्छता करण्यात आली होती. मात्र, गेल्या काही वर्षांत उपसा न झाल्याने पाण्यात ऑक्क्सिजनची पातळी खालावून मासे मृत्यूमुखी पडण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. हा प्रकार थांबविण्यासाठी पालिकेने ठोस उपायोजना राबवावी, पाण्याचा संपूर्ण उपसा करून तळे स्वच्छ करावे, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.