सातारा : कोरोनाचा अतिघातक डेल्टा प्लस विषाणूचे एकूण ५१ रुग्ण भारतात आढळले आहेत. त्यामुळे टेस्ट, ट्रॅक व ट्रीट या त्रिसूत्रीनुसार हे संक्रमण रोखण्याची जिल्हा प्रशासनाची तयारी सुरू झाली आहे. येत्या चार महिन्यांत मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रसार होणार असल्याची भीती राज्य सरकारने व्यक्त केली असून, ही लाट अधिक घातक असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. त्यामुळे सातारा जिल्हा प्रशासनाने सतर्कतेची पावले उचलण्यास सुरवात केली आहे.

    कोरोना विषाणूच्या ‘डेल्टा प्लस’ व्हेरिएंटसाठी केंद्र सरकारने नव्या गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. देशात डेल्टा प्लस व्हेरिएंटचे वाढते संक्रमण रोखण्यासाठी टेस्टिंग, ट्रॅकिंग आणि लसीकरणाची गती वाढवण्याचे निर्देश केंद्र सरकारने राज्यांना दिले आहेत. त्यामुळे गर्दीला आमंत्रण देणाऱ्या घडामोडी अथवा सोहळे टाळणे व केवळ कंटेन्मेंट झोनवर बंधने लागू करणे, टेस्ट आणि ट्रेसिंग इ नियम कटाक्षाने पाळण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी आरोग्य यंत्रणेला कटाक्षाने दिले आहेत .

    आतापर्यंत देशात डेल्टा प्लस व्हेरिएंटचे ५१ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामधील सर्वाधिक म्हणजेच २२ रुग्ण महाराष्ट्रातील आहेत. हा व्हेरिएंट अधिक संक्रमक असल्याने तिसऱ्या लाटेचा धोका वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे आठ राज्यातील दहा जिल्ह्यांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात ज्या सात जिल्ह्यांना सतर्कतेचा जो इशारा देण्यात आला, त्यामध्ये सातारा जिल्ह्याचा समावेश आहे. त्यामुळे संस्थात्मक विलगीकरण आणि करोना टेस्टच्या टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हा आरोग्य यंत्रणेने कंबर कसली आहे. ज्या जिल्ह्यात डेल्टा प्लसचे रुग्ण आढळतील तेथे तात्काळ कंटेन्मेंट झोन तयार करावेत.

    संक्रमितांचे नमुने तातडीने सार्स-सीओव्ही-टू जीनोमिक कंन्सोर्टियाच्या प्रयोगशाळेत पाठवावेत. तसेच लोकांच्या हलचालींवर निर्बंध लावावेत, असे केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्यांच्या मुख्य सचिवांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. डेल्टा संसर्ग आढळल्यास त्यांना विशेषरित्या विलगीकरणात ठेवण्याच्या सूचना आल्याने प्रशासनाने या निकषांच्या पूर्तीसाठी उपलब्ध वॉर्डची चाचपणी सुरू केली आहे .