कराड तालुक्यातील २५ सहकारी संस्थांच्या निवडणुका जाहीर ; मतदार यादी कार्यक्रम प्रसिद्ध

सहकार प्राधिकरणाने मुदत संपलेल्या आणि कोरोनामुळे प्रलंबित असलेल्या सहकारी संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. या अनुषंगाने एकूण सहा टप्प्यात निवडणूक कार्यक्रम होत आहे. पहिल्या टप्प्यात २०१९ मध्ये पात्र असलेल्या पण कोरोनामुळे निवडणुकीस स्थगिती देण्यात आलेल्या अशा सर्व प्रलंबित सहकारी संस्थाचा यात समावेश आहे.

  कराड : कोरोना महामारीचा फैलाव रोखण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने सर्व निवडणुकांना स्थगिती दिली होती. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील सहकार निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. कालांतराने कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला तसेच परिस्थिती नियंत्रणात असल्याने अखेर राज्य निवडणूक आयोगाने सहकार खात्याच्या प्रलंबित निवडणुकांचे कार्यक्रम हाती घेतले आहेत. त्यानुसार सहकारी संस्थांच्या निवडणुका होण्याचा मार्ग मोकळा झाला असून पहिल्या टप्प्यात कराड तालुक्यातील २५ सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे.

  सहकार प्राधिकरणाने मुदत संपलेल्या आणि कोरोनामुळे प्रलंबित असलेल्या सहकारी संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. या अनुषंगाने एकूण सहा टप्प्यात निवडणूक कार्यक्रम होत आहे. पहिल्या टप्प्यात २०१९ मध्ये पात्र असलेल्या पण कोरोनामुळे निवडणुकीस स्थगिती देण्यात आलेल्या अशा सर्व प्रलंबित सहकारी संस्थाचा यात समावेश आहे.

  कराड तालुक्यातील श्री कालिकादेवी सहकारी पतसंस्था, मंगलमूर्ती नागरी पतसंस्था, श्री महालक्ष्मी पतसंस्था, श्री लक्ष्मीदेवी ग्रामीण पतसंस्था, त्रिमूर्ती ग्रामीण पतसंस्था, स्वा.धनाजीराव मोहिते ग्रामीण, वैभवलक्ष्मी ग्रामीण बिगरशेती, पार्वती अर्बन को ऑफ सोसायटी, श्री गोरक्षनाथ ग्रामीण पतसंस्था, गोदडगिरी ग्रामीण पतसंस्था, शेती उत्पन्न बाजार समिती सेवक पतसंस्था, क्रांती महिला ग्रामीण बिगरशेती पतसंस्था, कालवडे बेलवडे उपसाजलसिंचन संस्था, श्री गजानन को ऑफ हौसिंग सोसायटी, सदगुरू बाळूमामा नाविन्यपूर्ण सेवा संस्था, यशराज धान्य व भाजीपाला प्रतवारी व स्वच्छता सेवा संस्था, शेतकरी ग्रोसरी सप्लायर्स सहकारी संस्था, घटनेश्वर पाणी पुरवठा संस्था, सह्याद्री सहकारी पाणी पुरवठा संस्था, कृष्णाई मजूर सहकारी संस्था,आंबामाता मजूर सहकारी संस्था,श्री गुरुदेव दत्त मजूर संस्था,अजिंक्य सेवा पुरविणारा संस्था व सह्याद्री मजूर सहकारी संस्थांचा समावेश आहे.या संस्थांचा प्रारूप मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर झाला असून प्रारूप मतदार यादी २० सप्टेंबर २०२१ रोजी प्रसिद्ध झाली आहे. यादीवर हरकती व आक्षेप नोंदवण्यासाठी २७ सप्टेंबर २०२१ दुपारी ३ वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. तर हरकतीवर निर्णय ४ ऑक्टोंबर २०२१ होणार आहे. अंतिम मतदार यादी ५ ऑक्टोबर २०२१ रोजी प्रसिद्ध करणेत येणार आहे.

  दुसऱ्या टप्प्यात न्यायालयीन आदेशानुसार व प्राधिकृत अधिकारी यांची नियुक्ती असलेल्या सहकारी संस्था तर दि.१ जानेवारी २०२० ते ३१ मार्च २०२० या कालावधीत तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकीस पात्र असलेल्या संस्था, चौथ्या टप्प्यात दि. १ एप्रिल २०२० ते ३० जून २०२० मधील पात्र संस्था, पाचव्या टप्प्यात दि. १ जुलै २०२० ते ३० सप्टेंबर २०२० व सहाव्या टप्प्यात दि. १ ऑक्टोंबर २०२० ते ३१ डिसेंबर २०२० या कालावधीमधील पात्र असणाऱ्या सहकारी संस्थांचा समावेश आहे.

  प्राधिकरण आदेशानुसार सहकारी संस्थांच्या निवडणुका टप्प्या टप्प्याने घेण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यातील संस्थांच्या प्रारूप मतदार यादीचा कार्यक्रम प्रसिध्द केलाआहे.

  - संदीप जाधव, उपनिबंधक कराड.