कृषी खात्याने पंचनामे न केल्याने शेतकरी अडचणीत

    वाई/दौलतराव पिसाळ : वाई तालुक्यातील ओझर्डे गावात या वर्षी शेतकऱ्यांनी अथक परिश्रम घेऊन अंदाजे २५० एकर टॉमेटो पिकाची एकरी ५० ते ७५ हजार रुपये खर्च करुन लागण केली होती. पण गेल्या आठवड्यात गारासह पडलेल्या मुसळधार पावसाने झोडपून काढल्याने हे पिक जखमी झाल्याने झाडांची आणि फळांची वाढ तर थांबलीच पण अनेक रोगांनी एकत्रित येऊन झाडांसह फळांवर थैमान घातल्याने हे पिक आर्थिकदृष्ट्या धोक्यात सापडल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

    टॉमेटो उत्पादक शेतकऱ्यांनी दिलेली माहिती अशी की, वाई ओझर्डे ता. वाई या गावातील शेतकऱ्यांनी कर्ज काढून अंदाजे २५० एकर इतकी टॉमेटो पिकाची लागण केली आहे. या पिकाला एकरी प्रत्येकी दीड रुपया प्रमाणे आठ हजार रोपे लागतात. रोपे मोठी झाल्यावर झाडे बांधण्यासाठी सुतळी काठी आणि तार उभे राहणारे झाड व त्यास लागणारे फळ हे रोगाला बळी पडू नये म्हणून विविध प्रकारची कीटकनाशक औषधे इत्यादी साहित्य रोखीने खरेदी करण्यासाठी ६० ते ७० हजार रुपयांचा खर्च येतो.

    प्रत्येक शेतकरी हा एकमेकांच्या चढाओढीने जास्तीत जास्त उत्पादन काढण्याची नेहमीच स्पर्धा करीत असतो, अशा स्पर्धेच्या गतीने प्रत्येक शेतकरी हा एकरी दोन ते अडीच लाख रुपये मिळवत असतो. दर पाच दिवसांनी टॉमेटो बाजारात विक्रीसाठी जातात. त्यातून मिळणाऱ्या पैशातून व्यवस्थित घरखर्च चालवत मुलांच्या शिक्षणाला हातभार लागतो. त्यामुळे प्रत्येक शेतकरी हा टॉमेटो पिकावर बायका पोराशी शेतात कष्ट करताना दिसतो. पण दुर्दैवाने गेल्या आठवड्यात वाई तालुक्यात झालेल्या गारांसह मुसळधार पावसाने टॉमेटो पिकाला झोडपून काढले.

    टॉमेटोचे फड हे जखमी झाल्याने प्रत्येक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. तर पेरलेल्या सोयाबीनच्या शेतात गुढघाभर पाणी साचल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट कोसळले आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा असल्याने शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे.