अखेर मरडमुरा रस्त्याचा प्रश्न मार्गी; शिवेंद्रसिंहराजेंच्या प्रयत्नांना यश

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजपर्यंत दुर्गम डोंगर भागातील मरडमुरे कुंभारगणी रेडिमूरा या गावातील जनतेने दळणवळणाअभावी हाल अपेष्टा भोगल्या आहेत. तर रस्त्याअभावी वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे काहींचे प्राणही गेले आहेत.

    मेढा : देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजपर्यंत दुर्गम डोंगर भागातील मरडमुरे कुंभारगणी रेडिमूरा या गावातील जनतेने दळणवळणाअभावी हाल अपेष्टा भोगल्या आहेत. तर रस्त्याअभावी वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे काहींचे प्राणही गेले आहेत. त्यामुळे या रस्त्याचा प्रश्न बिकट होता. मात्र, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendra Raje Bhosale) यांनी दिलेल्या भरघोस निधीमुळे वनविभागाच्या हद्दीतील या रस्त्याचा प्रश्न सुटल्यामुळे या मरडमुरे फाटा ते मरडमुरे रस्याचे खडीकरण-डांबरीकरणाचे काम मार्गी लागले.

    डोंगरमाथ्यावरील जनतेचा दळणवळणाचा प्रश्न मार्गी लागला आहे. या रस्त्यामुळे आता या भागात पर्यटनासही चालना मिळणार आहे. आमदारांनी दिलेला शब्द पाळल्याने मरडमुरे ग्रामस्थांनी कृतज्ञता व्यक्त केली.

    शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे डोंगरमाथ्यावरील गावांवर विशेष लक्ष असते. दुर्गम भागातील प्रत्येक गावामध्ये स्मशानभूमी, सभामंडप, काँक्रीटीकरण यासाठी ही भरघोस निधी त्यांनी उपलब्ध करून दिला. या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागल्याने दुर्गम डोंगर भागातील जनतेचे राहणीमान यामुळे बदलणार असून, शालेय विद्यार्थ्यांची १५ ते २० किलोमीटरची पायपीट थांबणार आहे. रस्त्याच्या भूमिपूजनासाठी डोंगरमाथ्यावरील जनता मोठ्या संख्येने कोरोनाचे नियम पाळून उपस्थित होते.