घरकूल योजनेतून मिळाला आधार : मकरंद पाटील

    खंडाळा : ग्रामीण भागातील दुर्बल, गोरगरीब जनतेला हक्काचा निवारा मिळावा या उद्देशाने काम केल्यामुळे घरकूल योजनेतून (Gharkul Yojana) आधार मिळाला आहे. यापुढील काळातही तालुक्यात योजना सक्षमपणे राबविण्यासाठी पंचायत समितीने प्रयत्न करावेत, असे आवाहन आमदार मकरंद पाटील (Makrand Jadhav) यांनी केले.

    खंडाळा पंचायत समिती अंतर्गत महाआवास योजना व सर्वोत्कृष्ठ ग्रामपंचायत पुरस्कार वितरण समारंभात आमदार पाटील बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले, सभापती राजेंद्र तांबे, उपसभापती वंदना धायगुडे पाटील, जिल्हा परिषद सदस्य मनोज पवार, दिपाली साळुंखे, जिल्हा नियोजनचे सदस्य शामराव गाढवे, पंचायत समिती सदस्य शोभा जाधव, चंद्रकांत यादव, अश्विनी पवार, गटविकास अधिकारी अमिता गावडे, अजय भोसले यासह प्रमुख उपस्थित होते .

    जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले म्हणाले, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विविध योजना तालुक्यात राबविता आल्याचे समाधान आहे. मुलभूत सुविधा सामान्य लोकांना देण्यासाठी प्रयत्नशील रहावे.

    पंचायत समितीचे सभापती राजेंद्र तांबे म्हणाले, घरकुलांचे दिलेले उद्दीष्ट पंचायत समितीने पूर्ण केले आहे. अधिकारी वर्गाने पाठपुरावा करून या कामात योगदान दिल्याने हे होऊ शकले. उर्वरित गरजूंना पुढील काळात घरकुले उपलब्ध करून देण्याचा मानस आहे .

    गतवर्षातील महाआवास अभियान काळात घरकुलांना उत्कृष्ट दर्जा देऊन विहित मुदतीत उद्दीष्ट पूर्ण करणाऱ्या वैयक्तिक लाभार्थी व ग्रामपंचायतींचा सन्मान करण्यात आला. प्रधानमंत्री आवास योजनेत तानाजी भोसले (प्रथम), हणमंत धायगुडे ( द्वितीय ) मंजुळा धायगुडे ( तृतीय ) तर ग्रामपंचायत खेड बुद्रुक ( प्रथम ) शिवाजीनगर (द्वितीय) मरीआईचीवाडी (तृतीय) क्रमांकाने गौरविण्यात आले . तसेच रमाई आवास योजनेत वैशाली वाघमारे ( प्रथम ) , शांताराम जाधव( द्वितीय ) हणमंत सपकाळ ( तृतीय ) तर ग्रामपंचायत भादे ( प्रथम ) सुखेड ( द्वितीय ) मोर्वे ( तृतीय ) क्रमांकाने सन्मानित करण्यात आले . त्याचबरोबर कोरोना काळात योगदान देणाऱ्या अधिकाऱ्यांना कोरोना योद्धा सन्मान देऊन गौरविण्यात आले.