महामार्गातील बाधित शेतकऱ्यांचा जमीन मोबदला द्या; रयत क्रांती शेतकरी संघटनेने घेतली गडकरींची भेट

    कराड : कराड-पाटण-हेळवाक महामार्ग बाधित शेतकऱ्यांना त्यांच्या बाधित जमिनीचा मोबदला लवकरात लवकर देण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष सचिन नलवडे व पदाधिकाऱ्यांनी केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी दिले. जमीन मोबदल्यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली.

    निवेदनात म्हटले आहे की, गुहागर-विजापूर या राज्यमार्गाचे रूपांतर राष्ट्रीय महामार्गात झाले आहे. पाटण ते कराडपर्यंतचे विस्तारिकरणाचे काम पूर्ण झाले आहे. कराड ते पाटणपर्यंत या महामार्गाला लागून पाटण तालुक्यातील २५ गावे तर कराड तालुक्यातील ६ गावे आहेत. दोन्ही तालुक्यातील ३१ गावातील शेतकऱ्यांची जमीन महामार्गात बाधित झाली आहे. या गावांचे निवाड़े जाहीर झाले असून, ते मंजूरीसाठी मुख्य अभियंता राज्य महामार्ग सार्वजनिक बांधकाम कोकण भवन, मुंबई यांच्याकडे पाठवण्यात आले आहेत.

    गेले तीन वर्षांपासून हेळवाक-कराड महामार्गाचे काम सुरु आहे. शेतकरी मोबदल्यापासून वंचित आहेत. तरी सदर निवाडे लवकरात लवकर मंजूर करुन शेतकऱ्यांना त्वरित बाधित जमिनीला शासनाच्या नवीन भूसंपादन कायद्याप्रमाणे खासगी वाटाघाटीच्या निर्णयानुसार बाजार भावाच्या पाचपट नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.