
एकरकमी एफआरपी बाबत कारखानदार एका शब्दानेही काही बोलत नाहीत. शेतकऱ्यांच्या कारखान्याकडे डे असलेल्या रकमेचा परतावा कसा होणार याबाबत सर्वजण मौन बाळगून आहेत. एकरकमी एफआरपी ही आमची रास्त अपेक्षा आहे. मात्र आमचे हक्काचे पैसे न मिळताच वसुली सुरू आहे.
पाटण : तालुक्यातील सहकारी पाणीपुरवठा संस्था व शेतकऱ्यांवर विजवितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारी वीजबील वसुलीसाठी दबाव टाकून सक्तीने बील वसूल करत आहेत. काही संस्था व शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन बंद करण्यात आले आहेत. कारखाना सुरू होऊन दीड महिना होऊनही आमची हक्काची एफआरपी रक्कम मिळाली नाही. ही रक्कम एकरकमी द्या अन्यथा वसुली थांबवा, अशी मागणी पाटण तालुका शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रशांत पाटील यांनी पत्रकाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, एकरकमी एफआरपी बाबत कारखानदार एका शब्दानेही काही बोलत नाहीत. शेतकऱ्यांच्या कारखान्याकडे डे असलेल्या रकमेचा परतावा कसा होणार याबाबत सर्वजण मौन बाळगून आहेत. एकरकमी एफआरपी ही आमची रास्त अपेक्षा आहे. मात्र आमचे हक्काचे पैसे न मिळताच वसुली सुरू आहे. शेतात रात्रंदिवस घाम गाळणाऱ्या शेतकऱ्यांना विचारात न घेताच दर ठरवला जातो. मात्र हे आमच्या हक्काचे पैसे देतानाही कधी द्यायचे, कसे द्यायचे याबाबत अनभिज्ञता आहे. यातच वीज वितरणचे अधिकारी, कर्मचारी वीज पुरवठा तोडत आहेत. त्यामुळे संघटीत झालेला शेतकरी आता हे खपवून घेणार नाही. आधी आमच्या हक्काचे पैसे अदा करा, मग वसुलीसाठी दारात या. दडपशाही कराल तर याद राखा, असा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, नाडे व मरळी येथील २ सिंचन योजनांची कनेक्शन तोडल्याची माहिती देत अन्य सर्वसामान्य शेतकऱ्यांना मुदतवाढ देणार असल्याचे आश्वासन वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिल्याची माहिती पाटील यांनी दिली.
वीज मंडळाचे कर्मचारी हेही शेतकऱ्यांची मुले आहेत. त्यामुळे शेतकरी बंधूंचा त्यांनी विचार करावा. आगाऊपणा करून शेती पंपाच्या जोडणीला हात लावाल तर गाठ आमच्याशी आहे. ज्या संस्था व शेतकऱ्यांच्या वीज जोडण्या तोडल्या आहेत. त्यांनी संघटनेशी संपर्क साधावा.
- प्रशांत पाटील, शेतकरी संघटना