मनोहर शिंदे यांनी निवडणूक आयोगाला अंधारात ठेवले; गोरख शिंदे यांचा गौप्यस्फोट

  कराड : मलकापूर नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी नगरपालिकेच्या निवडणुकीत आपल्या पेट्रोल पंपासह स्व:मालकीच्या विविध कंपन्यांची माहिती निवडणूक आयोगापासून लपवून ठेवली आहे. याप्रकरणी तक्रार करूनही कोणतीही कारवाई झालेली नाही. तर गो-का-क पाणी योजनेची जागा सहकार खाते व संस्थेच्या नियमावलीची पायमल्ली करत भाडेपट्टी करार करून स्वतःच्या पेट्रोल पंपासाठी घेतली आहे. याप्रकरणी दोषी असलेल्या संचालक मंडळास अपात्र करून गुन्हा दाखल करण्याची मागणी जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे केली आहे. तसेच संपूर्ण प्रकरणाचा तपास करण्यासाठी सीबीआय व ईडीकडे सर्व पुरावे सादर करणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते गोरख शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

  शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी या प्रकरणाशी संबंधित पुरावे उपस्थित पत्रकारांना दाखवले. त्याच्या प्रतिही दिल्या. गोरख शिंदे म्हणाले, मनोहर शिंदे यांनी भारत पेट्रोलियम कंपनीची डिलरशीप मिळवण्याकरीता गो-का-क सहकारी पाणी पुरवठा संस्थेची सर्व्हे नं. 283/अ 1 मधील 900 चौ. मी. जागा दीर्घ मुदतीचा भाडेपट्टा करून घेतली आहे. या जागेवर स्वत:च्या मालकी हक्काने भारत पेट्रोलियम कंपनीचा पेट्रोलपंप चालवत आहेत. वास्तविक, संचालक मंडळातील कोणत्याही सदस्याला संस्थेची जमीन भाडयाने देता येत नाही.

  संस्थेशी भाडेपट्टा व नोटरी व करार करता येत नाही, तशी स्पष्ट सहकार कायद्यात व गो-का-क सहकारी पाणीपुरवठा संस्थेच्या नियमावलीत स्पष्ट तरतुद आहे. तरीसुध्दा कायदा व नियम धाब्यावर बसवून मनोहर शिंदे यांनी जमीन भाडेपट्टा कराराची नोटरी केली आहे. त्यामुळे सदर ठरावास मान्यता देणारे संचालक व मनोहर शिंदे सहकार कायद्याने अपात्र ठरत आहेत. त्यांना अपात्र ठरवण्याची मागणी सातारा जिल्हा उपनिबंधक यांच्यासह कराड तालुका उपनिबंधक यांच्याकडे केली असल्याचे गोरख शिंदे यांनी सांगितले.

  तर मलकापूर नगरपालिकेच्या निवडणुकीत गो-का-क पाणी संस्थेशी झालेला भाडे कराराची माहिती मलकापूर नगरपालिका निवडणुकीच्या शपतपत्रात लपविली असून शेतीचे एकत्रित उत्पन्नही शपतपत्रात दाखवण्यात आलेले नाही. याशिवाय मनोहर शिंदे त्यांची पत्नी व मुलगा यांच्या नावे असलेल्या कंपन्यांची माहितीही निवडणूक आयोगापासून दडवण्यात आल्याचा गौप्यस्पोट गोरख शिंदे यांनी यावेळी केला.

  याच कंपन्यांची लपवली माहिती

  मनोहर शिंदे यांनी शिंदे इंजिनिअरींग प्रा.लि., डयरेक्टर ऑफ आगाशिवनगर इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी, मुलगा धनराज व पत्नी लता शिंदे यांच्या नावे असलेली डी. एम. एस. फॉसलीटी सहीसेस प्रा. लि. या कंपनीची माहिती निवडणूक आयोगापासून लपण्यात आल्याचे गोरख शिंदे यांनी सांगितले.

  शासकीय जागेवरील आरक्षण झोल

  डायरेक्टर ऑफ आगाशिवनगर इन्फ्रास्टक्चर प्रा.लि. या कंपनीमध्ये दिग्विजय पाटील, नारायण रैनाक, संदीप शिंदे, दिग्वीजय मोहन शिंगाडे, मनोहर शिंदे, शिवराज मोरे, प्रकाश बागल, राहुल पोळ, राजेंद्र यादव, संजय जाधव, सुनंदा बघाडे डायरेक्टर आहेत. यापैकी बघाडे या येथील पालिकेचे पाणी पुरवठा अभियंता उत्तम बघाडे यांच्या पत्नी आहेत. ही कंपनी प्रशासनाच्या जागेवर पालिकेला हाताशी धरून आरक्षण टाकते व नंतर आरक्षित जागेवरील आरक्षण उठवून ती जागा विकसीतकरून तिची विक्री केली जात असल्याचे गोरख शिंदे यांनी सांगितले.

  पुरावे सीबीआय व ईडीला पाठवणार

  याप्रकरणी प्रांताधिकारी उत्तम दिघे यांच्याकडे तक्रार करूनही कोणती कारवाई झालेली नाही. त्यामुळे मनोहर शिंदे व त्यांच्या कुटूंबाच्या नावे असलेल्या कंपन्यामधून काळ्या पैशाचा पांढरा पैसा झाला आहे का? व त्या पैश्यातून मनी लॉड्रिंग याचाही सहभाग का? यासाठीची कागदपत्रे सीबीआय व ईडीकडे सादर करणार असल्याचे गोरख शिंदे यांनी सांगितले.

  लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. त्यानुसार त्यांनी त्यांचे मत मांडले आहे. माझ्यावर झालेले आरोप ही न्यायप्रविष्ट बाब असून, त्याविषयी भाष्य करणे उचित ठरणार नाही.

  – मनोहर शिंदे, उपनगराध्यक्ष, मलकापूर