महिलांवरील अत्याचारावर गृहमंत्री तोंडसुध्दा उघडत नाहीत; चित्रा वाघ कडाडल्या

महाराष्ट्राला दोन-दोन गृहराज्यमंत्री असताना राज्यात महिला अत्याचारांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. सातारा जिल्ह्यातच बलात्काराच्या पाच घटना समोर आल्या त्यावर गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी चकार शब्द काढला नाही.

  सातारा : महाराष्ट्राला दोन-दोन गृहराज्यमंत्री असताना राज्यात महिला अत्याचारांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. सातारा जिल्ह्यातच बलात्काराच्या पाच घटना समोर आल्या त्यावर गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी चकार शब्द काढला नाही. आता महाबळेश्वरच्या अत्याचार प्रकरणात ते म्हणतात, आरोपींना सोडणार नाही. पण किमान त्यांना आधी पकडा तरी साहेब, अशा शब्दांत भाजप महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी गृहराज्यमंत्री देसाई यांच्यावर निशाणा साधला.

  चित्रा वाघ यांनी महाबळेश्वर येथे पीडित युवतीची भेट घेऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. तसेच महिला मोर्चाच्या अध्यक्षा उमा खापरे यांनी पीडितेच्या कुटुंबियांची महाबळेश्वरमध्ये भेट घेतली. चित्रा वाघ यांनी साताऱ्यात पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणात महाबळेश्वरचे माजी नगराध्यक्ष दत्तात्रय बावळेकर यांना सहआरोपी करण्याची जोरदार मागणी केली.

  चित्रा वाघ पुढे म्हणाल्या, सातारा जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यात महिलांवर अत्याचाराचे पाच प्रकार घडले. त्या घटनांवर राज्याचे गृहराज्यमंत्री काहीच बोलले नाहीत. राज्याला दोन गृहराज्यमंत्री आहेत. हे दोन्ही राज्यमंत्री आहेत कुठे?, राज्यात हाहाकार माजला आहे. कधी बोटभर प्रतिक्रिया या दोन्ही गृहराज्यमंत्र्यांनी दिलेली नाही. परंतु महिला अट्रॉसिटी प्रकरणात शंभूराजेंनी कोणाला सोडणार नाही असे वक्तव्य केले आहे. त्यांना मला विचारायचे आहे की त्यांनी आतापर्यंत कोणाला पकडले आहे हे जाहीर करावे, या शब्दांत गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचा चित्रा वाघ यांनी जोरदार समाचार घेतला.

  यावेळी भाजपच्या जिल्हाध्यक्षा सुरभी भोसले, सुनेशा शहा, नेहा खैरे यांच्यासह महिला पदाधिकारी उपस्थित होत्या. प्रत्येक गोष्टीचा तपास निष्पक्षपणे व्हावा. महाबळेश्वरचे माजी नगराध्यक्ष हे कुठल्या पक्षाचे आहेत हे न पाहता त्यांनाही सहआरोपी का पोलिसांनी केलेलं नाही. दत्तात्रय बावळेकर यांच्यासमोर दत्तक विधान होत असेल तर सहआरोपी करण्यात यावे. त्यांच्या मुलाची वकीलीची सनद रद्द करण्यात यावी, या प्रकरणात एसपी, डीवायएसपी लक्ष घालतील का असा परखड सवालही त्यांनी केला. रोज कोणा ना कोणाची अब्रू लुटली जाते आहे. पीडितेच्या जखमेवर मीठ चोळण्याचे प्रकार होत आहेत. वेदनेची थट्टा मुख्यमंत्र्यांनी चालवली आहे. याची लाज वाटते, असाही आरोप चित्रा वाघ यांनी केला.

  संजय राऊत तुम्ही कोणाचे थोबाड फोडाल ? 

  संजय राऊत तुम्ही विरोधकांचे थोबाड फोडायचे म्हणाला होतात ना. कोणाचे थोबाड फोडणार सांगा तुम्ही. राज्यात महिलावर अत्याचार वाढलेत तुमच्यात आहे का हिमंत सरकारचे थोबाड फोडायची. दिवसातून तीन तीन वेळा टीव्हीवर येता, सकाळी तेच सांगता, दुपारी तेच सांगता आणि संध्याकाळीही तेच सांगता, महिला अत्याचाराच्या घटना भाजपाच्या राज्यात घडल्या आहेत असे म्हणता, वेगवेगळय़ा प्रदेशात महिला अत्याचाराच्या घटना वाटणारे तुम्ही कोण? जगात घडत असलेल्या घटनेची जाणीव आम्हाला आहे. राज्यात महिला अत्याचाराच्या घटनांची टक्केवारी 13.2 एवढी आहे, अशीही टीका चित्रा वाघ यांनी केली.