‘घरोघरी शाळा’ उपक्रम विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा ठरेल : विनय गौडा

    वावरहिरे : माण तालुक्यातील या ठिकाणी सुरू असलेल्या ‘घरोघरी शाळा’ या उपक्रमांतर्गत नवीन शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिलीत प्रवेश घेतलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या घरातच तयार करण्यात आलेल्या स्वतंत्र शाळेचे उद्घाटन सातारा जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात पार पडले. यावेळी वडगाव गावचे सुपुत्र व वर्धा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन ओबासे प्रमुख उपस्थित होते.

    यावेळी त्यांनी घराच्या दाराला लावलेली रिबन कापून घरोघरी शाळेचे उद्घाटन करून घरात तयार केलेली शाळा पाहताच ‘छान केलयं तुम्ही सर्व’ असे सहज उद्गार गौडा यांनी काढले. कोरोनामुळे सर्वत्र लाॅकडाऊन, संचारबंदी असल्याने शाळा बंद आहे. त्यामुळे गेली दीड वर्ष डिजिटल आणि ऑनलाईन शिक्षणाचे वारे सर्वत्र वाहत आहे. या ऑनलाईन शिक्षणाची खरी भिस्त शिक्षक आणि पालकावरच आहे. ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थांचे उपेक्षित ज्ञानार्जन होत नाही. ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था अजूनही तितकीशी सदृढ नाही. आजही ग्रामीण भागातील पालकांकडे सर्रास स्मार्टफोन उपलब्ध नाहीत. त्यामुळे अनेक गरीब विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणापासून वंचितच राहू लागले.

    विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून वडगाव ता. माण येथील शिक्षकांकडून गेल्या दीड वर्षापासून घरोघरी शाळा हा उपक्रम अखंडपणे उपक्रम राबविला गेला. विद्यार्थीही यात रमून गेले. हा उपक्रम राज्याला दिशादर्शक असल्याचे सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौडा यांनी सांगितले. तसेच येथील शिक्षक संजय खरात यांना शब्बासकिची थाप देत या उपक्रमाचे कौतुक केले.