मी पाच वर्षे जिल्हाधिकारी म्हणून काम केलं, अजितदादा चुकून चुकले, जाहीर सभेत मागितली माफी

साताऱ्यातील एका कार्यक्रमात बोलताना अजित पवार चुकून चुकले! अजित पवार यांनी चुकून पालकमंत्री ऐवजी जिल्हाधिकारी हा शब्द वापरला. त्यावेळी बाळासाहेब पाटील यांनी ही चूक लक्षात आणून देताच अजितदादांनी माफी मागत आपली चूक सुधारली.

  सातारा : उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपली रोखठोक मतं आणि तडाखेबाज भाषणशैलीमुळं प्रचलित आहेत. एखाद्या सभेत किंवा बैठकीत ते कुणाला झापायलाही कमी करत नाहीत. मात्र, साताऱ्यातील एका कार्यक्रमात बोलताना अजित पवार चुकून चुकले! अजित पवार यांनी चुकून पालकमंत्री ऐवजी जिल्हाधिकारी हा शब्द वापरला. त्यावेळी बाळासाहेब पाटील यांनी ही चूक लक्षात आणून देताच अजितदादांनी माफी मागत आपली चूक सुधारली.

  अजित पवार नेमकं काय म्हणाले होते?

  अजित पवार हे सातारा जिल्ह्यातील वडूज इथल्या एका कोव्हिड रुग्णालयाच्या उद्घाटनासाठी आले होते. रुग्णालयाचं उद्घाटन अजितदादांच्या हस्ते पार पडलं. त्यानंतर अजित पवार यांनी आपल्या भाषणात तुफान फटकेबाजी केली. मी पाच वर्षे इथं जिल्हाधिकारी म्हणून काम केलं असल्यामुळे जिवाभावाचे अनेक सहकारी लाभले आहेत, असं अजितदादा म्हणाले.

  दरम्यान, व्यासपीठावर बसलेल्या पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या लक्षात ही चूक आली. पाटील यांनी एक चिठ्ठी पाठवत अजित पवारांना जिल्हाधिकारी नाही तर पालकमंत्री म्हणा, असं सांगितलं.

  आपलं भाषण सुरु असतानाच अजित पवारांनी ती चिठ्ठी वाचली. ‘मी जिल्हाधिकारी म्हणालो का? आता एवढं कुठे शिकलोय. मी आपला पालकमंत्री होतो. खूप दिवसांनी एवढी चूक झाली हो. यापूर्वी खूप मोठी चूक झाली होती आणि त्याची खूप मोठी किंमतही चुकवली होती. तेव्हापासून कानाला खडा लावला. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या समाधीपुढे बसलो आणि साहेब चुकलो असं म्हणालो’, असं अजितदादा म्हणाले.

  उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मोदींवर निशाणा

  बारामतीत एका कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना जोरदार टोला लगावलाय. ‘आम्ही पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यापासून उत्तम प्रकारे काम करणारे अनेक पंतप्रधान आपल्या देशाला मिळाल्याचे पाहिले. आता पंतप्रधान पदावर मोदीसाहेब आहेत. त्यांनी अलीकडे कोणाचाही पेट्रोल पंप असला तरी तेथे त्यांचा (मोदींचा) फोटो लावायचाच असा नियम केला आहे. त्यामुळे आम्ही गमतीने असे म्हणतो की, पेट्रोल 100 च्या पुढे गेलं. पेट्रोल भरताना तुम्ही त्यांच्याकडे बघायचं, मग ते म्हणतात कशी तुझी जिरवली… घाल आता 100 रुपयाचे पेट्रोल!’, असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर होते. येथील एका पेट्रोल पंपाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते.