मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला केलेल्या निर्देशांची जिल्ह्यात अंमलबजावणी करा : गृहराज्यमंत्री

    सातारा : जिल्ह्यातील कोरोना संदर्भातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल आढावा घेऊन आवश्यक ते निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले याची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करा, अशा सूचना गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केल्या.

    गृह राज्यमंत्री देसाई यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात कोरोनाचा उपाययोजनांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी सूचना केल्या. या बैठकीला जिल्हाधिकारी शेखर सिंह, अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे, अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

    तिसऱ्या लाटेच्या मुकाबल्यासाठी आत्तापासून आरोग्य सुविधा वाढविण्यावर भर द्यावा. जिल्ह्यात दुपारी ४ वाजेपर्यंत शिथिलता देण्यात आली आहे. ४ नंतर विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलीस विभागाने कारवाई करावी. लग्न समारंभ, हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करतात का यावरही लक्ष ठेवावे, अशा सूचनाही शंभूराज देसाई यांनी केल्या.