वडूज येथे जम्बो कोविड सेंटर उभारण्याच्या हालचालींना वेग; रणजितसिंह देशमुख यांच्या पाठपुराव्याला यश

    वडूज : कोरोनाच्या काळात खटाव-माण तालुक्यातील रुग्णांची होणारी गैरसोय थांबविण्यासाठी व तालुक्यात त्वरित जम्बो कोविड सेंटर होण्यासाठी हरणाई सूतगिरणीचे संस्थापक अध्यक्ष व काँग्रेसचे नेते रणजितसिंह देशमुख यांनी काँग्रेस पक्षातील मंत्री महोदय यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करीत जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना खटाव तालुक्याच्या दौऱ्यावर प्रत्यक्ष वस्तुस्थितीचा आढावा दिला. त्या पाठपुराव्याला यश मिळाले. वडूज येथे जम्बो कोविड सेंटर उभारण्याच्या हालचालींना वेग आला आहे. यामुळे रणजितसिंह देशमुख यांच्या काम करण्याच्या पद्धतीची चुणूक खटाव माणच्या जनतेला आली आहे.

    खटाव-माण तालुक्यात कोरोनाच्या लाटेत अनेकांना प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागला आहे. अपुऱ्या सोयीसुविधामुळे अनेकांची घरे उध्वस्त झाली आहेत, त्यामुळे रणजितसिंह देशमुख यांनी अत्यंत तळमळीने मंत्रालय स्तरावर अनेक हेलपाटे मारून ‘माझ्या जनतेला वाचवा’ अशी आर्त हाक बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, यशोमती ठाकूर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानासाहेब पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना दिली. त्यांनीही तातडीने प्रतिसाद देत खास बाब म्हणून खटाव-माणसाठी तातडीने जम्बो कोविड करण्याच्या सूचना दिल्या व रणजितसिंह देशमुख यांना प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा करण्यासाठी सांगितले.

    या सर्व बाबींना व रणजितसिंह देशमुख यांच्या प्रयत्नांना मूर्त स्वरूप येत असल्याचे दिसून येत आहे. वडूज येथे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी जंबो कोविड सेंटरसाठी जागेची पाहणी केली. लागणाऱ्या सोयी-सुविधासाठीचे पत्रव्यवहारही सुरू झाले आहेत, १०० बेडचे अद्ययावत कोविड सेंटर येत्या २८ दिवसात उभे राहण्यासाठी प्रशासकीय पातळीवर हलचाली सुरू झाल्या आहेत. खटाव तालुक्यातील केंद्रबिंदू असणाऱ्या ग्रामीण रुग्णालय वडुज या ठिकाणी शासनाच्या काही एजन्सीमार्फत कोविड सेंटर उभारले जाईल. त्यामुळे जनतेची ससेहोलपट थांबणार आहे. या निर्णयामुळे रणजितसिंह देशमुख यांना अनेक सामान्य लोकांनी संपर्क करून आभार मानले आहेत.

    ”दोन्ही तालुक्यातील जनतेची होणारी आर्थिक पिळवणूक, ससेहोलपट थांबविण्यासाठी हा एक छोटासा प्रयत्न आहे. खटाव-माणच्या जनतेच्या कोणत्याही प्रश्नांसाठी मी जीवाचे रान करण्यासाठी मागे-पुढे पाहत नाही, सर्वसामान्य दुष्काळी भागातील जनतेला न्याय देण्यासाठी मी कटिबद्ध आहे. जिल्हाधिकारी यांनी वरिष्ठ मंत्री महोदय व जिल्हा प्रशासन तसेच राज्य प्रशासन यांच्याशी संपर्क साधून ग्रामीण रुग्णालय वडूज याठिकाणी जम्बो कोविड सेंटर उभारण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि लवकरच याला यश प्राप्त होईल. म्हणून मी तालुक्यातील जनतेच्या वतीने जिल्हा प्रशासनाचे आभार मानतो.”

    – रणजितसिंह देशमुख, काँग्रेस नेते.