नारळ फोडणाऱ्या गँगला नारळ देऊन घरी पाठवण्याची वेळ आली आहे ; आमदार शिवेंद्रसिंहराजे यांचा उदयनराजे यांना अप्रत्यक्ष टोला

आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी खरमरीत टीका करताना खासदार उदयनराजे भोसले यांच्या सत्ताधारी सातारा विकास आघाडीचा खरपूस समाचार घेतला . ते पुढे म्हणाले शाहूपुरीकरांना पाणी वीस वर्ष मिळाले नाही असे ते म्हणतात . येथील ग्रामपंचायतीत त्यांच्याच कार्यकर्त्यांची इतकी वर्ष सत्ता होती मग का पाणी मिळाले नाही .आपला नाकर्तेपणा लपविणे आणि दुसऱ्या वर खापर फोडणे हे उद्योग त्यांनी बंद करावेत . सातारा शहराची हद्दवाढ सुध्दा यांच्याच राजकारणामुळे दोन वर्ष लांबणीवर पडली .

    सातारा : सध्या साताऱ्यात नारळफोड्या गॅंगचा सुळसुळाट असून दुसऱ्याने मंजूर केलेल्या कामांची ही गँग उद्घाटन व भूमिपूजन करत आहेत, या नारळ फोडणाऱ्या गँगला हाच नारळ देऊन घरी पाठविण्याची वेळ आली आहे असा खरमरीत टोला आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी खासदार उदयनराजे भोसले यांचे नाव न घेता त्यांना लगावला आहे .

    एका खासगी उद्घाटन समारंभ कार्यक्रमात आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी खरमरीत टीका करताना खासदार उदयनराजे भोसले यांच्या सत्ताधारी सातारा विकास आघाडीचा खरपूस समाचार घेतला . ते पुढे म्हणाले शाहूपुरीकरांना पाणी वीस वर्ष मिळाले नाही असे ते म्हणतात . येथील ग्रामपंचायतीत त्यांच्याच कार्यकर्त्यांची इतकी वर्ष सत्ता होती मग का पाणी मिळाले नाही .आपला नाकर्तेपणा लपविणे आणि दुसऱ्या वर खापर फोडणे हे उद्योग त्यांनी बंद करावेत . सातारा शहराची हद्दवाढ सुध्दा यांच्याच राजकारणामुळे दोन वर्ष लांबणीवर पडली .पालिकेत सत्ताधाऱ्यांनी केवळ बोगस बिले काढून केवळ खाण्याचे काम केले .साताऱ्यात सध्या नारळ फोडणारी गॅंग निर्माण झाली आहे, जी कामे मंजूर झाली आहेत, त्याचे नारळ फोडायला ही मंडळी पुढे असतात. वीस वर्षापासून साताऱ्याला पाण्यापासून वंचित ठेवले असे त्यांचे म्हणणे असेल तर, त्या वेळी ते सुद्धा खासदार होते. युतीच्या काळात ते मंत्री होते. तसेच, शाहूपुरी ग्रामपंचायत पहिल्यापासून त्यांच्याकडेच राहिली आहे. येथील पंचायत समिती सदस्य ही त्यांचे आहेत. मग वीस वर्षापासून शाहूपुरीला पाण्यापासून वंचित कोणी ठेवले, याचा खुलासा त्यांनी करावा, असे शिवेंद्रराजे यांनी स्पष्ट केले .

    शिवेंद्रराजे म्हणाले, शाहूपुरीवासीयांनी तुमच्याकडे जबाबदारी दिली होती. मुळात दिलीप सोपल पाणीपुरवठा मंत्री असताना या योजनेला मंजुरी मिळाली. त्यावेळी मी स्वतः मुंबईत होतो. तसेच, यावेळी दुसरा महत्वाचा निर्णय झाला की, लोकवर्गणीची अट रद्द झाली. त्यावेळी ही योजना मंजूर झाली. मात्र, पुढे प्रशासकीय मान्यतेत ही योजना पुन्हा अडकली होती. परंतू अजितदादांनी सुधारित प्रशासकीय मान्यता दिली. त्यावेळी कास योजनेलाही मान्यता मिळवून दिली. त्याच वेळी शाहूपुरी योजनेलाही मान्यता मिळाली. सातारा शहराच्या हद्दवाढीचा निर्णय यापूर्वी झाला असता. मात्र, त्यांच्या आडमुठ्या भूमिकेमुळे दोन वर्षापासून ही हद्दवाढ रखडली होती, अशी टीका देखील त्यांनी उदयनराजेंवर केली.

    आता पालिकेच्या निवडणुकीत मते पाहिजेत म्हणून स्वत:चे अपयश दुसऱ्यावर टाकण्याचे काम ते करत आहेत. यामुळेच ते भाऊसाहेब महाराजांवर विनाकारण जुने काहीतरी काढून टीका करत आहेत. याकडे साताऱ्यातील जनतेने लक्ष देऊ नये, असा सल्लाही शिवेंद्रराजेंनी दिला.