पर्यावरणासाठी झटणाऱ्यांना जवळवाडी ग्रामपंचायतीकडून ‘जावळी पर्यावरण रक्षण सन्मान पुरस्कार’

    केळघर/नारायण जाधव : आपले कुटुंब, घर, प्रपंच याबरोबरच अन्य जबाबदाऱ्या पेलत समाजाचे आपण काही देणे लागतो या उद्दात्त हेतूने आज काही कार्यकर्ते एकत्र येऊन समाजहिताचे आणि पर्यावरण रक्षणाचे कार्य निरपेक्ष भावनेने निस्वार्थपणे करीत असून, त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप मिळावी व भविष्यात आणखी कार्य करण्याची प्रेरणा मिळावी, यासाठी जवळवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने प्रा. संध्या चौगुले यांच्या हस्ते तालुक्यातील तीन संस्थांचा गौरव करण्यात आला. त्यांच्या या कार्याचे त्यांनी कौतुक केले.

    जावळी तालुक्यामध्ये सातत्यपूर्ण कामगिरीतून कुडाळ येथील युवक व ग्रामस्थांनी एकत्र येवून सुरू केलेला, महाराष्ट्रातील अभिनव ऊपक्रम म्हणजेच आदर्शवत ठरत असलेले व लोकवर्गणीतून उभारण्यात येत असलेले कुडाळचे ‘पिंपळबन’…. वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन, वणवा विझविणे, नदी स्वच्छता मोहिम या अंतर्गत पर्यावरण रक्षणासाठी सातत्यपूर्ण कामगिरी करणारे, अनेक युवक जीवाची बाजी लावून ध्येयाने झपाटून रात्रंदिवस कार्यरत असलेले संघटन म्हणजेच पाणी फौंडेशन जावळी व जावळी मित्र मेळा या तीनही संस्थांना आज जावळी पर्यावरण रक्षण पुरस्काराने गौरविताना आम्हांला विशेष आनंद होत असल्याचे जवळवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंंच वर्षा विलास जवळ यांनी सांगितले.

    सामाजिक कार्य करताना कार्यकर्त्यांना अनेकवेळा टीकाटिप्पणी सहन करावी लागते. पण आपण ठरविलेल्या कार्यात ध्येयाचा ध्यास लागला की कामाचा अजिबात त्रास होत नाही. प्रवाहाबरोबर सर्वच चालतात पण प्रवाहाच्या विरोधात जाणार्‍यांचाच इतिहास लिहिला जातो. समाजासाठी नव्हे तर स्वतःच्या समाधानासाठी काम करीत राहा. एक दिवस समाज आपल्या कार्याची नक्कीच दखल घेतो, हेच आजच्या पुरस्कारातून दिसून येते.

    पिंपळबनच्या वतीने सचिन मदने व राणी क्षीरसागर, पाणी फौंडेशनच्या वतीने विश्वनाथ डिगे व प्रदिप धनावडे आणि जावळी मित्र मेळाचे वतीने ॲड. अनुप लकडे व उषा उंबरकर यांनी पुरस्कारांचा स्वीकार केला.