वाई हत्याकांड : ज्योती मांढरेने तिच्यावर केलेले सर्व आरोप फेटाळून लावले

ज्योती मांढरेवर केलेल्या आरोपाचे पुरावे अद्याप न्यायालयात सादर करण्यात आले नसल्याचे सरकार पक्षातर्फे सांगण्यात आले. या सुनावणीवेळी सरकारी वकील उज्ज्वल निकम हे स्वतः हजर होते. या खटल्याची पुढील सुनावणी ८ एप्रिल रोजी होणार आहे.

    सातारा : वाईतील व्यापारी ओसवाल यांच्यासह त्यांच्या मारेकऱ्यांचा खूनही ज्योती व तिच्या सहकाऱ्यांनी केला असल्याचा आरोप न्यायालयात बचाव पक्षाने गुरुवारी केला. यानंतर ज्योतीने तिच्यावर केलेले सर्व आरोप फेटाळून लावले.

    जिल्हा न्यायालयात वाईतील सहा जणांच्या हत्याकांडाची सुनावणी सुरू आहे. हे हत्याकांड वाईतील कथित डॉक्टर संतोष याने केले होते. बचाव पक्षाकडून माफीचे साक्षीदार ज्योती मांढरे हिचा उलट तपास घेताना सलग दुसऱ्या दिवशीही बचाव पक्षाने तिच्यावर आरोपांच्या फैरी झाडल्या. पोलिसांशी हातमिळवणी करून ज्योती मांढरे ही ब्लॅकमेल करून पैसे उकळायची. वाईतील व्यापारी ओसवाल यांचा खूनही ज्योती व तिची बहीण भावजी यांनी मारेकऱ्यांना सांगून त्यांचा खून केला. मारेकरी आपले नाव घेतील म्हणून संबंधित मारेकऱ्यांचाही खून ज्योतीने केला. असे एकूण चार खून ज्योतीने केल्याचा आरोप बचाव पक्षाने केला आहे. ओसवाल यांचा खून करणारे ज्योतीच्या घराशेजारी राहत होते व ते ज्योतीच्या परिचयाचे होते असा आरोपही बचाव पक्षाने केला. यावेळी ज्योतीने हे सर्व आरोप खोटे असल्याचे न्यायालयात सांगितले.

    दरम्यान, ज्योती मांढरेवर केलेल्या आरोपाचे पुरावे अद्याप न्यायालयात सादर करण्यात आले नसल्याचे सरकार पक्षातर्फे सांगण्यात आले. या सुनावणीवेळी सरकारी वकील उज्ज्वल निकम हे स्वतः हजर होते. या खटल्याची पुढील सुनावणी ८ एप्रिल रोजी होणार आहे.