कराड-चिपळूण महामार्गाचे काम अखेर सुरू; मनसेच्या लढ्याला यश

कराड-चिपळूण महामार्गाच्या (Karad Chiplun Highway) निकृष्टकामाबाबत एल. अँड टी. कंपनीसह बांधकाम विभागाच्या बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई व रस्ता दुरुस्तीबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना पाटण तालुकाध्यक्ष गोरख नारकर यांच्या आंदोलनाला यश मिळाले आहे. बऱ्याच ठिकाणी रस्त्याची कामे सुरू झालेली पाहायला मिळत आहेत.

    पाटण / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : कराड-चिपळूण महामार्गाच्या (Karad Chiplun Highway) निकृष्टकामाबाबत एल. अँड टी. कंपनीसह बांधकाम विभागाच्या बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई व रस्ता दुरुस्तीबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना पाटण तालुकाध्यक्ष गोरख नारकर यांच्या आंदोलनाला यश मिळाले आहे. बऱ्याच ठिकाणी रस्त्याची कामे सुरू झालेली पाहायला मिळत आहेत.

    मनसे तालुकाध्यक्ष गोरख नारकर यांनी सहकाऱ्यांसमवेत येथील तहसीलदार कार्यालयासमोर बेमुदत अमरण उपोषण सुरू केले होते. त्यावेळेस कंपनीने मनसैनिकांनी केलेल्या उपोषणाच्या हत्यारापुढे नमते घेतले होते. एल. अँड टी. कंपनी व बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांनी पाटण प्रशासनाशी चर्चा केली. त्यानंतर मनसेनेच्या मागण्या मान्य केल्यानंतर उपोषण मागे घेतले होते.

    त्यानंतर मनसैनिक व पत्रकार यांच्यासोबत कंपनीचे तसेच बांधकाम अधिकारी यांचा एकत्रितपणे रस्ता पाहणी कार्यक्रम झाला. त्यावेळेस ठिकठिकाणी असलेले खड्डे, अपुरे काम, चुकीचे फलक निदर्शनास आणून दिले होते. यानंतर कंपनीने यावर लवकरात लवकर काम सुरू करू, असे आश्वासन दिले होते. गोरख नारकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी सतत पाठपुरावा केल्याने अखेर रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू झाल्याने वाहनधारकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

    रस्त्याच्या डागडुजीचे काम सुरू असले तरी माझे जे १५ मुद्दे मी सांगितले होते. त्यातील बऱ्याच गोष्टी अजून पूर्ण झाल्या नाहीत. बरीच उत्तरे मला समाधानकारक मिळाली नाहीत. अजून बरेच प्रश्न प्रलंबित ठेवले आहेत. यावर लवकरात लवकर मार्ग काढावा अन्यथा मनसैनिक शांत बसणार नाहीत.

    – गोरख नारकर, तालुकाध्यक्ष, मनसे, पाटण.