फ्लेक्स कारवाईत कराड पालिकेचा दुजाभाव : राजकीय द्वेषातून नगराध्यक्षा टार्गेट ; कराड पालिकेला सोयीस्करपणे ठरावाचा विसर

कराड शहराचे फ्लेक्सच्या माध्यमातून होणारे विद्रुपीकरण निदर्शनास आणून देत स्मिता हुलवान यांनी घेतलेल्या भूमिकेचे त्यावेळी स्वागत झाले. आता त्याच ठिकाणी कराडातील विविध विकासकामांच्या शुभारंभाचा जाहिरात फलक विनापरवानगी उभारण्यात आला आहे.

  पराग शेणोलकर/कराड : कराड शहरात सार्वजनिक ठिकाणी विनापरवानगी फ्लेक्स लावून शहराचे विद्रुपीकरण केल्याप्रकरणी नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांचे पती उमेश शिंदे यांच्यावर पालिकेने काही महिन्यांपूर्वी गुन्हा दाखल केला आहे. असाच प्रकार नुकताच घडला. मात्र, याप्रकरणी पालिकेला पालिकेनेच केलेल्या ठरावाचा सोयीस्करपणे विसर पडला आहे की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

  त्याचे घडले असे की, राज्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी कराड नगरपालिकेच्या विविध ११५ कामांसाठी ११ कोटी २६ लाखांचा निधी दिला आहे. या विकास कामांचा प्रातिनिधिक शुभारंभ सोमवार दि.२० डिसेंबर २०२१ रोजी पार पडला. या शुभारंभ समारंभाचे जाहिरात फलक झळकले. यापैकी प्रभाग १२ मधील “शनिवारपेठ अरविंद कोळी घर ते जयसिंग पवार यांच्या घरापर्यंतचा रस्ता खडीकरण व डांबरीकरण” असा उल्लेख असलेला जाहिरात फ़लक शिवाजी पवार (तात्या) व उदय हिंगमिरे मित्रपरिवार यांच्यावतीने कराड पालिकेच्या सार्वजनिक जागेत म्हणजे रस्त्याच्या कडेला लावला आहे. हा फलक लावण्यासाठी पालिकेची परवानगी घेण्यात आली नसल्याची माहिती समोर आली आहे. हा विनापरवानगी लावण्यात आलेला जाहिरात फलक पालिका प्रशासनाच्या नजरेतून निसटला कसा? असा प्रश्न या निमित्ताने समोर आला आहे.

  दरम्यान, याच ठिकाणी नगराध्यक्षा रोहिणी शिंदे व पती उमेश शिंदे यांनी “आता लक्ष कराड नगरपरिषद” अशा आशयाचा शुभेच्छा कम जाहिरात फलकावर मात्र हरकत घेतली. तो फलक खासगी जागेत असतानाही नगराध्यक्ष यांचे पती उमेश शिंदे यांच्यावर परवानगी घेतली नसल्याचे कारण देत पोलिसात गुन्हा दाखल केला. याकामी पालिकेची तत्परता दिसून आली. तीच तत्परता नुकत्याच झालेल्या विकास काम शुभारंभ फलकासंदर्भात पालिका दाखवणार का? याची उत्सुकता ताणली गेली आहे.

  हुलवान यांनी केली होती तक्रार
  नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांचे पती उमेश शिंदे यांनी “सहकार पॅनेलचे विजयी उमेदवार व आता लक्ष कराड नगरपरिषद” अशा आशयाचे फलक लावल्यानंतर संबंधित फ्लेक्सबाबत कराड नगरपालिकेकडे परवानगी घेण्यात आली आहे का? या संदर्भात महिला व बालकल्याण सभापती स्मिता हुलवान यांनी लेखी पत्राने विचारणा केली. उलट अर्जात परवानगी घेण्यात आली नसेलतर संबंधितांवर पालिकेच्या ठरावानुसार गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणीही त्यांनी पालिकेकडे केली होती. पालिकेने तातडीने याप्रकरणी तत्परता दाखवत कारवाई केली. उमेश शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल केला. याकामी पालिकेच्या ठरावाचा दुजोरा देण्यात आला होता.

  आता हुलवान तक्रार करणार?
  कराड शहराचे फ्लेक्सच्या माध्यमातून होणारे विद्रुपीकरण निदर्शनास आणून देत स्मिता हुलवान यांनी घेतलेल्या भूमिकेचे त्यावेळी स्वागत झाले. आता त्याच ठिकाणी कराडातील विविध विकासकामांच्या शुभारंभाचा जाहिरात फलक विनापरवानगी उभारण्यात आला आहे. या फलकामुळे शहराचे विद्रुपीकरण होत नाही का? अशी चर्चा सुरू आहे. हा फ्लेक्स लावणाऱ्यांवर पालिकेच्या ठरावानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी सभापती स्मिता हुलवान करणार का? अशी चर्चा असून त्यांच्या भूमिकेकडे लक्ष लागून राहिले आहे.

  सामाजिक हित की राजकीय द्वेष
  कराड नगरपालिकेच्या मालकीच्या जागा, रस्ते, चौक आदी ठिकाणी शुभेच्छा, वाढदिवस, अभिनंदन आदी सर्व प्रकारचे जाहिरात फलक लावण्यास दि.१७ जानेवारी २०१९ च्या ठरावाने पालिकेने बंदी घातली आहे, असे असलेतरी चौकाचौकात, गल्लीबोळात सार्वजनिक जागेत, खासगी इमारतींवर विना परवाना फलक लावण्यात येत आहेत. त्यामुळे संपूर्ण शहर फलकांनी झाकाळून जात आहे. मात्र, या प्रकरणी पालिका सोयीस्करपणे भूमिका घेताना दिसत आहे. तर अशा तक्रारीत सामाजिक हित की राजकीय व्देष यावर कराडकर बारकाईने लक्ष ठेऊन आहेत.

  कराड शहरांमधील प्रभाग क्रमांक १२ मध्ये दि. २० डिसेंबर २०२१ रोजी लावण्यात आलेल्या विकास काम शुभारंभ फ्लेक्स बोर्ड संदर्भात कोणतीही मागणी पालिकेकडे करण्यात आलेली नाही.

  -मिलिंद शिंदे, आरोग्य निरीक्षक कराड पालिका