
सध्या तालुक्यातील वेगवेगळ्या ठिकाणी हे रुग्ण उपचार घेत आहेत. दरम्यान, चिकुनगुनिया सदृश्य आजाराच्या साथीला प्रतिबंध करण्यासाठी आरोग्य विभागाची यंत्रणा सतर्क झाली आहे. त्यामध्ये चिकुनगुनिया सदृश्य लक्षणाचे रुग्ण आढळून येत असलेल्या तालुक्यातील गावागावात रुग्ण सर्व्हे, रक्त नमुन्यांचे संकलन, गरजूंना औषधांचे वाटप व डासांच्या अळ्या शोधून त्या नष्ट करण्याची मोहिम आरोग्य विभागाकडून हाती घेण्यात आली आहे.
पराग शेणोलकर, कराड : कोरोना महामारीवर नियंत्रण मिळवण्यात यशस्वी झालेल्या कराड तालुका आणि शहरातील आरोग्य विभाग मात्र चिकुन गुनिया या साथीच्या आजाराचा फ़ैलाव रोखण्यात अपयशी ठरला आहे. ताप, सर्दी, खोकल्याबरोबरच सांधे आखडणे आदी चिकुनगुनियाची लक्षणे असलेल्या रुग्णांनी शहरी व ग्रामीण भागातील दवाखाने फुल्ल आहेत. आरोग्य विभाग स्थानिक पालिका व ग्रामपंचायतींच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे तालुक्याला चिकुन गुनियाचा विळखा पडला आहे.
कोरोना महामारीवर मात करण्यासाठी तालुका प्रशासनासह अनेक समाजसेवी संघटनानी मोठे प्रयत्न केले. या प्रयत्नाला नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. परिणामी कोरोनाला रोखण्यात कराड तालुक्याला यश आले आहे. परंतु कोरोना सदृश्य लक्षणे असणारे अन्य साथीच्या आजाराने मात्र पाय रोवले आहेत. यामध्ये डेंग्यू आणि चिकनगुनिया सारख्या गंभीर आजारांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला आहे. यात कराडउत्तर मधील उंब्रज मसूर, पाल, ओगलेवाडी आदी विभागासह अनेक गावांमध्ये सांडपाणी निचरा व स्वच्छतेचा अभाव दिसून येत आहे. परिणामी मच्छरांचा प्रादुर्भाव वाढला आहे.
कराड दक्षिण मधील विशेषत: रेठरे, कार्वे, काले, उंडाळे, वारुंजी, तांबवे आदी विभागातील बहुतांश गावात डेंग्यु व चिकुन गुणियाचा प्रादुर्भाव वाढला आहे. यात वारुंजी, आटके, हणबरवाडी, कालवडे, बेलवडे बुद्रूक, या पाच गावांमध्ये सुमारे आठवडाभरापासून चिकुनगुनिया सदृश्य शेकडो रुग्ण आढळून आले आहेत. तर कराड शहरालगतच्या सैदापूर, गजानन हौसिंग सोसायटीमध्ये सुद्धा वाढता प्रादुर्भाव आहे.
आरोग्यविषयक कामकाजाविषयी प्रश्नचिन्ह
कराड नगरपालिका व मलकापूर नगरपालिका कार्य क्षेत्रातही डेंग्यू व चिकुनगुनिया सदृश्य रुग्ण खासगी दवाखान्यात उपचारासाठी गर्दी करत आहेत. या साथ आजाराचा फ़ैलाव वाढल्याने दोनही नगरपालिकांच्या आरोग्यविषयक कामकाजाविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
आरोग्य विभागाच्या सूचनांकडे ग्रामपंचायतींचे दुर्लक्ष
सध्या तालुक्यातील वेगवेगळ्या ठिकाणी हे रुग्ण उपचार घेत आहेत. दरम्यान, चिकुनगुनिया सदृश्य आजाराच्या साथीला प्रतिबंध करण्यासाठी आरोग्य विभागाची यंत्रणा सतर्क झाली आहे. त्यामध्ये चिकुनगुनिया सदृश्य लक्षणाचे रुग्ण आढळून येत असलेल्या तालुक्यातील गावागावात रुग्ण सर्व्हे, रक्त नमुन्यांचे संकलन, गरजूंना औषधांचे वाटप व डासांच्या अळ्या शोधून त्या नष्ट करण्याची मोहिम आरोग्य विभागाकडून हाती घेण्यात आली आहे. मात्र यासाठी स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाचे कोणतेही सहकार्य आरोग्य विभागाला मिळत नाही. वारंवार पत्रव्यवहार करूनही नाले वाहते करणे तसेच जनजागृतीसाठी ग्रामपंचायतीकडून कोणतीही कारवाई केली जात नसल्याचे दिसून आले आहे.
कृष्णा हॉस्पिटलच्या पुढाकाराची गरज
तालुक्यातील रेठरे बुद्रूक, आटके, हणबरवाडी, कालवडे, बेलवडे बुद्रूक या गावात गत दहा ते बारा दिवसांमध्ये चिकुन गुनिया सदृश्य साथीच्या रोगाचे शेकडो रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे गावातील खासगी दवाखान्यांमध्ये उपचारासाठी मोठी गर्दी होत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. मात्र यात सामान्यांचे आर्थिक शोषण होत असल्याने कृष्णा हॉस्पिटल कराड दक्षिण आणि उत्तर विभागात तालुका आरोग्य विभागाच्या मदतीने स्वतंत्र शिबिरांचे आयोजन करण्याची मागणी होत आहे.
औषध साठा मर्यादित
चिकुनगुनिया सदृश्य साथीच्या रोगाचा कराड तालुक्यात फैलाव झाला आहे. परंतु, आरोग्य विभागाकडे त्यासाठी आवश्यक औषधांचा साठा उपलब्ध नाही.
कराड तालुक्यातील काही गावांमध्ये चिकुनगुनिया सदृश्य साथीच्या रोगाचा फैलाव झाला आहे. सर्दी, खोकला, ताप, सांधेदुखी आदी. लक्षणे रुग्णांमध्ये आढळून येत आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाकडून संबंधित गावांत रुग्ण सर्व्हे, डास अळ्यांचे निर्मूलन व त्यासाठी ॲबिटींगचे काम हाती घेण्यात आले आहे. तसेच नागरिकांना कोणती काळजी घ्यावी, याबाबत प्रबोधन केले जात आहे.
- डॉ. सुनिल कोरबू, तालुका आरोग्य अधिकारी, कराड.