
भुईंज : रचनात्मक काम करणाऱ्यापुढे अनेकजण जाणीवपूर्वक शंका उपस्थित करीत असतात. आज सहकारी साखर कारखानदारी खाजगीकरणाकडे वळत असल्याचे चित्र आहे. कारखान्याचा कुटुंबप्रमुख या नात्याने आतापर्यंत सभासद व कामगारांनी जो विश्वास दाखविला आहे. त्या विश्वासाच्या जोरावर मी व माझे व्यवस्थापन वाटचाल करीत आहे. पुढील काळात याच विश्वासाच्या व आपल्या कौटुंबिक एकीच्या जोरावर कोणतेही संकट यशस्वीपणे परतावून लावू, असा विश्वास किसन वीर साखर कारखान्याचे अध्यक्ष मदनदादा भोसले यांनी व्यक्त केला.
येथील किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याची सन २०२० – २१ या आर्थिक वर्षाच्या ५० व्या अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा कारखान्याचे कार्यस्थळावरून कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर व शासनाच्या आदेशानुसार ऑनलाईन पध्दतीने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे विविध विषयांवर विचार करण्यासाठी आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.
मदनदादा भोसले पुढे म्हणाले, जांबच्या उजाड माळरानावर किसन वीर आबांनी कारखान्याचं एक स्वप्न पाहिलं ते स्वप्न साकार केलं व आज ते बहरलं आहे. त्यावेळीही समाजातील काही अपप्रवृत्तीनं आबांवर टीका केलेली होती. परंतु आबांनी त्याकडे दुर्लक्ष करून कारखाना उभा केला. त्यावेळी तंत्रज्ञान एवढ प्रगत नसतानाही जुन्या पिढीतील आबा व त्यांच्या सहकाऱ्यांनी कारखान्याची उभारणी करून अपप्रवृत्तींना उत्तर दिलं.
२००३ साली सभासदांनी ज्या विश्वासाने कारखान्याची सूत्रे हातात दिल्यानंतर संस्थेची काय परिस्थिती होती व आता नवनविन प्रकल्प उभारल्यानंतर संस्थेची जी प्रगती झालेली आहे. खंडाळा व प्रतापगड कारखान्यामध्ये आर्थिक गुंतवणुकीमुळे कारखान्यावर आर्थिक ताण आलेला आहे. ही वस्तुस्थिती असली तरी आमच्यासमोर प्रतापगड व खंडाळा कारखान्याचे सभासद, कामगारांचे हित जोपासण्याचा आमचा प्रामाणिक उद्देश होता.