कृष्णा बँकेचे कार्यक्षेत्र आता संपूर्ण महाराष्ट्र : ५० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत निर्णय; ८५० कोटी व्यवसायाचे उद्दिष्ट

गेल्यावर्षी आलेल्या कोरोना संकटामुळे सर्वच क्षेत्रांबरोबरच बँकींग क्षेत्रासमोरही अनेक आव्हाने निर्माण झाली. पण या काळात सभासद व ठेवीदारांच्या सहकार्यामुळे बँकेने आपले व्यवहार, सर्व नियमांचे पालन करून सुस्थितीत ठेवले. याचाच परिणाम म्हणून कोरोना काळातही बँकेने उत्तम प्रगती करत, गेल्या आर्थिक वर्षात ६५० कोटींचा व्यवसाय टप्पा पार केला. किंबहुना सन २०२०-२१ या वर्षात बँकेचा एकूण व्यवसाय ९६ कोटींने वाढला आहे.

  कराड : महाराष्ट्र राज्यातील सर्वांसाठी बँकिंग सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आणि व्यवसाय वृद्धीसाठी कृष्णा सहकारी बँकेने राज्यभर शाखा विस्तार करण्याचे धोरण आखले आहे. या धोरणानुसार बँकेचे कार्यक्षेत्र आता संपूर्ण महाराष्ट्र करण्याचा महत्वपूर्ण निर्णय बँकेच्या ५० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत घेण्यात आला.

  य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि बँकेचे चेअरमन डॉ. अतुल भोसले यांच्या अध्यक्षतेखाली अक्षता मंगल कार्यालयात बँकेची ५० वी वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाईन पद्धतीने पार पडली. यावेळी व्यासपीठावर उपाध्यक्ष दामाजी मोरे, संचालक शिवाजीराव थोरात, मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत कापसे यांच्यासह कृष्णा कारखान्याचे संचालक दयानंद पाटील, श्रीरंग देसाई, जे. डी. मोरे, बाबासो शिंदे, शिवाजी पाटील, वसंतराव शिंदे, बाजीराव निकम, विलास भंडारे, राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे संचालक विठ्ठल पाटील, पं.स. सदस्य बाळासाहेब निकम यांची प्रमुख उपस्थिती होती.

  चेअरमन डॉ. अतुल भोसले म्हणाले, गेल्यावर्षी आलेल्या कोरोना संकटामुळे सर्वच क्षेत्रांबरोबरच बँकींग क्षेत्रासमोरही अनेक आव्हाने निर्माण झाली. पण या काळात सभासद व ठेवीदारांच्या सहकार्यामुळे बँकेने आपले व्यवहार, सर्व नियमांचे पालन करून सुस्थितीत ठेवले. याचाच परिणाम म्हणून कोरोना काळातही बँकेने उत्तम प्रगती करत, गेल्या आर्थिक वर्षात ६५० कोटींचा व्यवसाय टप्पा पार केला. किंबहुना सन २०२०-२१ या वर्षात बँकेचा एकूण व्यवसाय ९६ कोटींने वाढला आहे. या वर्षात बँकेच्या ठेवींमध्ये ८२६७.९४ लाख इतकी लक्षणीय वाढ झाली असून, ३१ मार्च २०२१ अखेर बँकेच्या ठेवी ४३५७६.१९ लाख इतक्या झालेल्या आहेत. गेली सलग ९ वर्षे बँकेचा नेट एन.पी.ए. शून्य टक्के राहिला आहे. बँकेचे आर्थिक आरोग्य हे भांडवल पर्याप्ततेच्या प्रमाणावर तपासले जाते. रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार भांडवल पर्याप्तता प्रमाण ९ टक्क्यांच्या वर असावे लागते. कृष्णा बँकेचे भांडवल पर्याप्तता प्रमाण १७.६३ टक्के एवढे झाले असून, बँकेला ‘अ’ वर्ग दर्जा प्राप्त झाला आहे. बँकेने मिळविलेल्या नफ्याच्या अनुषंगाने सभासदांना १० टक्के लाभांश देण्याचा निर्णयही संचालक मंडळाने घेतला आहे. येत्या आर्थिक वर्षात बँकेने ८५० कोटींचा व्यवसाय करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

  सभेला कृष्णा बँकेचे संचालक प्रदीप थोरात, हर्षवर्धन मोहिते, प्रमोद पाटील, हणमंत पाटील, बाळासो पवार, महादेव पवार, चंद्रहास जाधव, नामदेव कदम, तातोबा थोरात, संतोष पाटील, ॲड. विजय पाटील, बँकेच्या व्यवस्थापकीय मंडळाचे चेअरमन सचिन तोडकर, राजेंद्र कुंभार, गुणवंत जाधव यांच्यासह सभासद उपस्थित होते.

  ग्राहक व सभासदांच्या विश्वासाला पात्र
  गेल्या ५० वर्षात बँकेच्या वाटचालीत अनेक चढउतार आले, पण प्रत्येक संकटावर मात करत कृष्णा बँक आज प्रगतीपथावर पोहचली आहे. बँकिंग क्षेत्रात झपाट्याने बदल होत आहेत. तंत्रज्ञानाचा वापर वाढत चालला आहे. या सर्व नव्या गोष्टींचा अवलंब करत, कृष्णा बँक पुढे वाटचाल करत आहे. सभासद व ग्राहकांच्या विश्वासाला पात्र राहून कार्य करत असल्यानेच आज कृष्णा बँकेचा मोठा विस्तार होत असल्याचे डॉ.सुरेश भोसले यांनी सांगितले.