गनिमी काव्याने साखर कारखानदारांना वठणीवर आणूः राजू शेट्टी

थकित एफआरपी आणि वीज बिलासंदर्भात २२ मार्च रोजी सह्याद्री सहकारी कारखान्यावर थकीत एफआरपी साठी बेमुदत धरणे आंदोलन करणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी १२ मार्च रोजी कराड मध्ये येऊन दिला होता.

  • एफआरपी प्रश्नी शेट्टींची सहकारमंत्र्यांशी चर्चा, ५ एफ्रिलचा अल्टीमेटम

कराड : पाच एप्रिलपर्यंत थकीत कारखान्यांची आरआरसी केली नाही तर यापूर्वी झाला नाही असा धमाका गनिमी काव्याने करून साखर कारखानदारांना वठणीवर आणू असा इशारा शेट्टींनी विश्रामगृह येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिला. दरम्यान सहकार मंत्री बाळासाहेब पाटील व राजू शेट्टी यांच्यात एफआरपी प्रश्नी आज चर्चा झाली. यावेळी ज्या कारखान्यांनी पूर्ण एफआरपी दिलेली नाही त्यांची आरआरसी (रेव्हेन्यू रिकवरी सर्टिफिकेट) करायला आम्ही तयार आहोत, असे आश्वासन सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टींना येथे दिले.

थकित एफआरपी आणि वीज बिलासंदर्भात २२ मार्च रोजी सह्याद्री सहकारी कारखान्यावर थकीत एफआरपी साठी बेमुदत धरणे आंदोलन करणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी १२ मार्च रोजी कराड मध्ये येऊन दिला होता. आज सकाळी काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. राजू शेट्टी कारखान्यावर पोहोचण्यापूर्वी पोलिसांनी त्यांना पुणे बंगळूर महामार्गावर मालखेड फाटा येथे ताब्यात घेतले. तेथून त्यांना कराडच्या शासकीय विश्रामग्रहात आणले. तेथे शेट्टींनी ठिय्या आंदोलन छेडले.
सकारात्मक चर्चा झाल्याशिवाय कराड सोडणार नसल्याचे माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.

दुपारी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील व राजू शेट्टी यांच्यात शासकीय विश्रामगृहात बैठक झाली. या बैठकीत शेट्टींनी त्यांचे मुद्दे मांडले. त्यावेळी सरकारकडून होत असल्याच्या कार्यवाहीची माहिती देत या प्रश्नावर एक तारखेला पुण्यात साखर आयुक्तालयात आपण सर्व कारखान्यांचा आढावा घेणार आहोत. त्यानंतर आरआरसी करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात येईल, असे सहकार मंत्र्यांनी सांगितले. या बैठकीत झालेल्या चर्चेची माहिती शेट्टी यांनी माध्यमांना दिली.

ते म्हणाले, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी एक एप्रिलला साखर आयुक्तालयात जाऊन साखर कारखान्यांच्या थकीत एफआरपीची माहिती घेणार आहेत. ३१ मार्च अखेर साखर कारखान्यांकडे २३०० कोटी एफआरपीची थकीत होती. आम्ही पाच एप्रिलला साखर आयुक्तालयात जाऊन साखर आयुक्तांकडून माहिती घेणार आहोत. शासनाने कारवाई न केल्यास पाच तारखेला पुण्यात साखर आयुक्तालयास घेराव घालून जाब विचारणार असल्याचे सांगितले. तोपर्यंत एफआरपी दिली गेली नाही तर यापूर्वी झाला नाही असा धमाका करून साखर कारखानदारांना वठणीवर आणू. शेतकऱ्यांच्या पिळवणूक करणाऱ्या साखर कारखानदारांना आंदोलनाच्या माध्यमातून धडा शिकवू असा इशारा शेट्टींनी दिला.