मधुमिताच्या ‘राईसप्लेट’ला आंतरराष्ट्रीय स्पर्धेत उत्कृष्ट विनोदी शॉर्टफिल्मचा पुरस्कार

  सातारा : येथील मधूमिता अभिजित वाईकर दिग्दर्शित ‘राईस प्लेट’ या विनोदी शॉर्टफ़िल्मला इंडियन स्टार इंटरनॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल (ISISFF २०२१) उत्कृष्ट विनोदी शॉर्टफिल्मचा पुरस्कार मिळाला. मधूमिता कला अकादमी संचलित अभिव्यक्त अभिनय व नृत्य शाळेतर्फे निर्माण केलेली ही शॉर्टफिल्म अभि वाईकर फिल्म्स् या यूट्युब चॅनेलवर प्रदर्शित केली आहे.

  कलाशिक्षक, नाटककार अभिजित वाईकर व रंगकर्मी-शिक्षिका शिल्पा वाईकर यांची कन्या मधूमिताला कलेचा वारसा जन्मतःच मिळाला आहे. मधूमिताने आजपर्यंत ‘कधी उलट कधी सुलट’ व ‘नाथ हा माझा’ या व्यावसायिक नाटकांत अभिनय केला आहे.’शाळा’, झोका, गुगलगाव वाय फाय, जी एफ बी एफ या वेबसिरीज, ‘बुमरँग, कंपाउंडस, उम्मीद’ सारखे लघुपट, ‘वुई द विनर्स’, ‘हॅलो’ इत्यादी एकांकिका व बालरंगभूमी वरील बालनाट्य, नाटिका पासून २ अंकी ५ मराठी-हिंदी नाटकात अभिनय, दिग्दर्शन, संकलन, संगीत संयोजन अशा सर्व तांत्रिक बाबींवर काम करण्याचा तिला बालपणापासून अनुभव आहे.

  सातारा येथील कन्या शाळा व अनंत इंग्लिश स्कूलमध्ये शालेय शिक्षण घेऊन तिने पुणे बावधन येथील सुर्यदत्ता कॉलेजला बी. एस. सी. ऍनिमेशन केले आहे. युट्युबवर सुप्रसिद्ध अंधश्रद्धेवर भाष्य करणाऱ्या अशा ‘झोका’ या डॉ. राजेंद्र माने लिखित फिल्मचे तिने दिग्दर्शन केले. या फिल्मला रसिक प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद लाभला. ‘बॉडी नं.१३’ या थरार फिल्ममध्ये देखील तिने मध्यवर्ती भूमिका साकारत मेकअप कला देखील शिकून घेतली. भयानक चेहऱ्याच्या मेकअपसाठी ती तास-तास भर परिश्रम घेत होती. वेस्टर्न तसेच भरत नाट्यम नृत्य व अभिनयामध्ये वैशिष्ट्यपूर्ण काम करीत असलेल्या मधुमिताला चित्रकलेची देखील आवड आहे.

  राईसप्लेट या शॉर्टफिल्ममध्ये खाद्य संस्कारातील अनावश्यक दिखाऊपणा, सोपस्कार यावर मार्मिक भाष्य केले आहे व पोटाच्या भूकेसाठी आवश्यक दोन घासांची किंमत काय असते याबाबतचा मिश्कीलपणे संदेश ही शॉर्टफिल्म देते. बलराम कलबुर्गी, किशोरी क्षीरसागर, ओंकार ताटे, कोमल मोरे, वनराज कुमकर, संजीव आरेकर, प्रतीक्षा जंगम, गायत्री केळकर, वैशाली जेबले, हिमांशू व खुशी जेबले, संजीव आरेकर व इतर कलाकारांनी यात अभिनय केला आहे. कॅमेरामन राहुल भोंडे असून संकलन तथा संगीत संयोजन आशिष पुजारी व अभिजित वाईकर यांनी केले आहे. शॉर्टफिल्म हॉटेल प्रीती एक्झिक्युटिव्ह व हॉटेल बकुळा येथे चित्रित झाली. त्याबद्दल मधूमिताने तेथील हॉटेल मॅनेजमेंटच्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले.

  इंडियन स्टार इंटरनॅशनल शॉर्टफिल्म फेस्टिव्हलमध्ये ९२ फिल्म्स भारतातून तर १६ फिल्म्स इटली, फ्रांस, अमेरिका, रशिया, कुर्दीस्तानातून सहभागी झाल्या होत्या. पहिल्याच वर्षात केवळ दीड महिन्याच्या कालावधी मध्ये १०८ फिल्म सहभागी झाल्या त्यातून बेस्ट ५० फिल्मना नामांकन मिळाले. २nd टप्पा मध्ये एकूण २० फिल्म्स nominated झाल्या.

  ज्येष्ठ नाट्य-सिनेभिनेता अरूण नलवडे हे संस्थापक, अध्यक्ष आहेत. संतोष जाधव हे आयोजक होते. ज्युरी म्हणून अरुण नलावडे, शिरीष राणे, अनिकेत के. यांनी काम बघितले. ही शॉर्टफिल्म अभि वाईकर फिल्म्स या युट्युब चॅनेलवर प्रेक्षकांना पाहण्यासाठी उपलब्ध आहे. आगामी ‘गुगलगाव वायफाय’ या रोमँटिक विनोदी वेबसिरीज मधून मधूमिता नव्या मजेदार भूमिकेत रसिकांचे मनोरंजन करण्यासाठी लवकरच येत आहे.