पर्यटनासाठी महाबळेश्वर ‘सज्ज’; प्रशासनाकडून सुरक्षेचा आढावा

    महाबळेश्वर : महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून प्रसिद्ध असलेले महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण पर्यटकांसाठी खुले झाले आहे. यानंतर कोणत्याही क्षणी पाॅइंटही पर्यटकांसाठी खुले करण्याचे आदेश येण्याची शक्यता आहे. हे गृहीत धरून पुढील दोन दिवसांत सर्व पॉइंटची स्वच्छता करून सुरक्षेचा आढावा घेण्याचा निर्णय वनक्षेत्रपाल दिलीप झगडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या बैठकीत घेण्यात आला.

    सातारा जिल्ह्यातील कोरोना रूग्णवाढीचा दर खाली आल्याने जिल्ह्यात लागू करण्यात आलेल्या लाॅकडाउनचे नियम शिथिल करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी शेखरसिह यांनी जाहीर केले. त्यामुळे तब्बल साडे तीन महिन्यांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर महाबळेश्वर हे पर्यटनस्थळ पर्यटकांसाठी खुले झाले. पहिल्यांच दिवशी येथेे १०५४ पर्यटकांनी महाबळेश्वर येथे येऊन पावसाळी पर्यटनाचा आनंद लुटला. पावसाळ्यात येणारे पर्यटक हे पॉइंट पाहण्यासाठी नव्हे तर पावसात मनसोक्त भिजण्यासाठी तसेच डोंगरावरून वाहणारे धबधबे पाहण्यासाठी येतात. अशा हौशी पर्यकांची येथे आता काही दिवसातच गर्दी होण्यास सुरूवात होईल हे आज आलेल्या पर्यटकांच्या गर्दीवरून स्पष्ट होत आहे.

    दरम्यान, महाबळेश्वरची बाजारपेठ ही सोमवारपासून सुरू होणार असल्याने पावसाळी पर्यटनासोबत महाबळेश्वरच्या खास बाजारपेठेत पर्यटकांना खेरेदीचा आनंद लुटता येणार आहे. पावसाळ्यात सुरक्षेच्या दृष्टीने महाबळेश्वरचे अनेक पाॅइंट हे बंदच असतात. मात्र, शहराजवळ आणि पर्यटकांच्या दृष्टीने सुरक्षित असलेले काही पॉईंट हे वन विभागाच्या ताब्यात आहेत. त्याचप्रमाणे येथील प्रसिध्द वेण्णालेक हा पालिकेच्या ताब्यात आहे.

    वन विभागाच्या ताब्यात असलेल्या पॉइंटपैकी केटस् पॉइंट, विल्सन पाॅइंट, लाॅडविक पॉइंट, मुंबई पॉइंट आणि प्रसिध्द लिंगमळा धबधबा हे पॉइंट पर्यटकांसाठी सुरू करण्यात येणार आहे. त्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी शेखरसिंह हे काढणार आहेत. ते लवकरच प्राप्त होणार आहेत. मात्र, तत्पूर्वी सर्व पावसाळी पॉइंटच्या स्वच्छतेचे काम हाती घेणे आवश्यक आहे. यासाठी आज वनक्षेत्रपाल दिलीप झगडे यांच्या अध्यक्षतेखाली येथील हिरडा विश्रामगृहावर संयुक्त वन व्यवस्थापन समित्यांच्या अध्यक्ष व सचिवांची त्याचप्रमाणे महासमितीचे पदाधिकारी यांची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत जिल्हाधिकारी यांचे आदेश येण्यापूर्वीच सर्व पाॅईंटची स्वच्छता करून पाॅइंट हे पर्यटकांच्या दृष्टीने सुरक्षित असल्याचा आढावा समितीने पुढील दोन दिवसात घ्यावा, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.