कराडमध्ये महाविकास आघाडीचा निषेध मोर्चा; प्रांताधिकाऱ्यांना दिले निवेदन

    कराड : केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी तीन जुलमी कायद्यांच्या विरोधात उत्तरप्रदेशमधील लखीमपूर-खेरी येथे आंदोलन करीत असलेल्या शेतकऱ्यांच्या अंगावर केंद्रीयमंत्री पुत्राने जीप घालून त्यांना चिरडले. ही अत्यंत अमानुष घटना असून, या घटनेने लोकशाहीवर घाला घातला आहे. या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी व शेतकऱ्यांच्या पाठीशी ठाम उभे राहण्यासाठी आज महाविकास आघाडीच्या घटक पक्षांकडून ‘महाराष्ट्र बंद’ पुकारला आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत कराड दक्षिण काँग्रेस कमिटी, कराड शहर काँग्रेस कमिटी यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला.

    मोर्चाची सुरुवात कोल्हापूर नाक्यावरील महात्मा गांधीजी यांच्या पुतळ्याला अभिवादन करून झाली. पोपटभाई पेट्रोल पंप, शहर पोलीस स्टेशन, शाहू चौक ते दत्त चौक येउउज्ज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाला अभिवादन करून मोर्चा थेट प्रशासकीय इमारतीवर धडकला. यावेळी भाजप सरकारच्या हुकूमशाही विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी प्रांताधिकाऱ्यांना निवेदन दिले. दरम्यान, कराड शहरातील व्यापाऱ्यांना बंदमध्ये सामील होण्यासाठी आवाहन यावेळी करण्यात आले. आंदोलनात कराड दक्षिण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोहर शिंदे, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, कराड शहर काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र उर्फ आप्पा माने, यांच्यासह राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष नंदकुमार बटाणे, युवक अध्यक्ष प्रतापराव साळुंखे, शिवसेनेचे रामभाऊ रैनाक यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.

    यावेळी ऍड. उदयसिंह पाटील-उंडाळकर म्हणाले, ही घटना ज्या दिवशी घडली तो भारताच्या लोकशाहीतील काळा दिवस आहे. शेतकऱ्यांवरील हल्ला हा लोकशाहीवरील हल्ला आहे. आपल्या देशात लोकशाही आहे व ती जीवंत राहण्यासाठीच आजचा हा बंद महाविकास आघाडीकडून पुकारला आहे. महाराष्ट्र हे देशातील अग्रेसर राज्य असून, शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी हा बंद केला गेल्याने देशभर लोकशाहीपूरक संदेश जाईल. केंद्र सरकारने जे तीन काळे कायदे केले आहेत. ज्यामुळे देशातील शेतकरी देशोधडीला लागणार आहे. या कायद्याच्या विरोधात गेली दीड ते दोन वर्षे शेतकरी आंदोलन करीत आहेत. हे आंदोलन चिरडण्याचा वेळोवेळी प्रयत्न केद्रातील भाजप सरकारकडून करण्यात आला आहे.