सातारा जिल्ह्यात मकरसंक्रांत पारंपारिक पद्धतीने साजरी

सातारा जिल्ह्यात शुक्रवारी मकरसंक्रांतीचा सण महिलांनी मोठ्या उत्साहात साजरा केला. मकर संक्रांतीनिमित्त सुवासिनींनी घराघरात वाण देण्याची पर्वणी साधली. त्यामुळे यावर्षी विविध वाणांची बरसात पहायला मिळाली. ओमायक्रॉनच्या संसर्गातही संक्रातीचा उत्साह तसूभरही कमी झाला नाही.

    सातारा : सातारा जिल्ह्यात शुक्रवारी मकरसंक्रांतीचा (Makar Sankranti) सण महिलांनी मोठ्या उत्साहात साजरा केला. मकर संक्रांतीनिमित्त सुवासिनींनी घराघरात वाण देण्याची पर्वणी साधली. त्यामुळे यावर्षी विविध वाणांची बरसात पहायला मिळाली. ओमायक्रॉनच्या संसर्गातही संक्रातीचा उत्साह तसूभरही कमी झाला नाही.

    मकर संक्रांतीनिमित्त कालपासून बाजारपेठेत गर्दी पहायला मिळत होती. तिळगूळ, वाण, हळदी-कुंकू, पानाचे विडे, हळकुंड, सुपारी, खारीक, खोबरे खरेदी करण्यासाठी महिलांची गर्दी झाली होती. गुरुवारी दुपारनंतर वसे घेण्याचा मुहूर्त असल्याने वसे आणि हळदीकुंकू हे दोन्ही कार्यक्रम एकत्र घेतल्याचे दिसून येत होते. हळदीकुंकवाचा कार्यक्रम झाल्यानंतर एकमेकांना तीळगूळ देत महिलांनी मकरसंक्रांत मोठ्या उत्साहात साजरी केली. संक्रांत येवू नये म्हणून बर्‍याच ठिकाणी घराघरात किमती वाण देण्याची पर्वणी साधली गेली.

    सातारा जिल्हयात करोनाच्या सावटातही तिळगूळ वाटपाचा स्नेहपूर्ण गोडवा जपण्यात आला. सुवासिनींनी हळदी कुंकवाच्या निमित्ताने एकमेकींच्या ओट्या भरून तिळगूळ वड्यांनी एकमेकींचे तोंड गोड केले . सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांना शुभेच्छा दिल्या जात होत्या .तिळगूळ घ्या, गोड बोलाअशा आशयाचे मेसेज आज दिवसरभर सोशल मीडियावर पहायला मिळत होते.