आरक्षणासाठीच्या पदयात्रेला साताऱ्यातून सुरूवात; शिवसेनेच्या अमोल आवळेंची माहिती

  सातारा : बहुजनांना पहिले आरक्षण देणारे राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून मराठा, धनगर, मुस्लिम आरक्षणासाठी मराठ्यांची राजधानी सातारा ते राजभवन मुंबई हा प्रवास पदयात्रेच्या माध्यमातून राज्याचे राज्यपाल यांना सातारा येथून मुंबईपर्यंत ३४० किमी अंतर पायी चालत जाऊन आरक्षण मागणीचे निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती फलटण-कोरेगाव मतदार संघाचे शिवसेना क्षेत्र प्रमुख अमोल आवळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

  आवळे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शाहीर अण्णाभाऊ साठे व पोवई नाक्यावरील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सातारा ते मुंबई या ३४० किलोमीटरच्या पदयात्रेला सुरूवात केली. येथील शाहू चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून तेथे पत्रकारांशी अमोल आवळे यांनी संवाद साधला. राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाऊसाहेब वाघ, हमीदभाई पठाण, भिमाशंकर अहिरेकर, शैलेंद्र भोईटे, निलेश भोईटे उपस्थित होते.

  आवळे पुढे म्हणाले, महाराष्ट्रात मराठा आरक्षणासाठी एक मराठा लाख मराठा ५८ मोर्चे निघाले. त्यात अनेक तरुणांनी आहुती दिली. त्यांच्या बलिदानामुळे अनेक कुटुंब उध्वस्त झाली. नुकताच मराठा आरक्षणाच्या संदर्भात मागासलेपण सिद्ध न करता आल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण नाकारले. मात्र, कोर्टाने केंद्र सरकारच्या माध्यमातून मार्ग निघू शकतो, असे सूचित केले होते. हा आरक्षण मुद्दा केंद्र सरकारच्या अधीन असल्याचे त्यांनी सांगितले.

  २६ जुलै १९०२ ला राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानातील मागासवर्गीय लोकांसाठी आरक्षण देण्याचा निर्णय घेतला देशातील पहिले आरक्षण छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी दिले. सरकारी नोकऱ्यांतील पन्नास टक्के जागा राखीव, आरक्षित ठेवल्या आणि आरक्षणाबाबतचा हाच जाहिरनामा करवीर गॅझेटमधून प्रसिद्ध करण्यात आला होता. त्याचबरोबर बहुजनांना शिक्षणासाठी दारे खुली केली. ११९ वर्षांपूर्वी हा बहुजनांसाठी निर्णय घेतला होता. शाहू महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून, पदयात्रेच्या माध्यमातून या मराठा आरक्षणासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा होणे गरजेचे आहे आणि त्यासाठी पायी प्रवास व निवेदनाद्वारे तसेच लक्ष्य वेदण्यासाठी हा प्रयत्न आहे.

  तसेच ओबीसींचे राजकीय आरक्षण सुप्रीम कोर्टाकडून थांबवण्यात आले. यामध्ये केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टाला प्रायोगिक जनगणनाची माहिती दिली पाहिजे होती, त्या आधारावर, स्थानिक स्वराज्य संस्थेचे ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण पूर्ववत होणे गरजेचे आहे. २०१७ पासून ओबीसी, एससी आणि इतर समाजाच्या नोकरीमधील बढत्या, पदोन्नती थांबवण्यात आल्या आहेत. ती बढती मिळावी अशा विविध मागण्यासाठी सातारा येथून २६ ला छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतीराव फुले, आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून या आरक्षण मागणीसाठी पदयात्रेला प्रारंभ करण्यात येणार आहे.

  राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या माध्यमातून निवेदन देऊन पंतप्रधान यांना राज्यातील या तीन समाजाच्या आरक्षणाच्या मागण्या पूर्ण करण्याच्या भावना व संदेश या पदयात्रेच्या माध्यमातून पोहचवण्यासाठी या पदयात्रेत फलटण- कोरेगाव मतदारसंघाचे शिवसेना क्षेत्रप्रमुख अमोल आवळे, राष्ट्रीय समाज पक्ष्याचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाऊसाहेब वाघ, कोरेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती व राष्ट्रवादीचे प्रमुख कार्यकर्ते जयेंद्र लेंभे, कॉंग्रेसचे जेष्ठ नेते हमीदभाई पठाण,भाजपचे नितीन चव्हाण, आरपीआयचे किशोर सोनवणे, दयानंद पोळ आणि शिवसेनेचे दत्ता जाधव या सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांचा समावेश असून, सातारा ते मुंबई ३४० कि.मी.चा पायी प्रवास केला जाणार आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.