निर्बंधात खंडेराया-म्हाळसाशी विवाहबद्ध; पालनगरी भंडाऱ्याविना सुनीसुनी

कोरोना महामारीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करत महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेशच्या लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व कुलदैवत असलेल्या पाल (ता.कराड) येथे तारळी नदीकाठी शनिवारी गोरज मुहूर्तावर देवाचे मानकरी व सेवेकरी यांच्या उपस्थितीत श्री खंडेराया-म्हाळसाशी विवाहबद्ध झाला.

  उंब्रज : कोरोना महामारीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करत महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेशच्या लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व कुलदैवत असलेल्या पाल (ता.कराड) येथे तारळी नदीकाठी शनिवारी गोरज मुहूर्तावर देवाचे मानकरी व सेवेकरी यांच्या उपस्थितीत श्री खंडेराया-म्हाळसाशी विवाहबद्ध झाला. एरवी भंडाऱ्यात न्हाहून निघणारी पालनगरी यंदा भंडाऱ्याविना सुनीसुनी दिसत होती.

  दरम्यान, कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने घातलेल्या कडक निर्बंधामुळे पारंपारिक व साध्या पद्धतीने ओपन फुलांनी सजवलेल्या जीपमधून सोबत शिवाजी बुवांचा मानाच्या गाड्यासह देवाचे मानकरी व सेवेकरी यांनी यावर्षी मिरवणूक काढली.

  पाच किलोमीटर अंतरावरच भाविकांना प्रवेशबंदी

  विवाहसोहळ्याचा मुख्य दिवस असल्याने पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवत पालनगरीत येणारे सर्व रस्ते बंद करून बाहेरून येणाऱ्या कोणासही प्रवेश दिला नाही. यात्रेच्या अनुषंगाने पाल नगरीत १४ ते १९ पर्यंत व २३ रोजी देवस्थान ट्रस्ट व पाल गावातील मानकरी सोडून इतर गावातील, जिल्ह्यातील, इतर राज्यातील भाविकांना दर्शनास मनाई करण्याचे आदेश पारीत करण्यात आले होते. तसेच मंदिर परिसरातील ५ किलोमीटर अंतरावरून नागरिकांना आत येण्यासाठी प्रवेश बंद करण्यात आला होता.

  मानकरी देवराज पाटील यांचा चिरंजीव तेजराज पाटील यांनी ग्रामप्रदक्षिणा घालत दुपारी खंडोबा मंदिरात आले. यावेळी तेजराज पाटील यांच्या हस्ते देवाची विधीवत पूजा करण्यात आली. त्यानंतर मानाच्या गाड्यात देवास बसवून अंधार दरवाजापर्यंत देवाची मिरवणूक काढण्यात आली. अंधार दरवाजाजवळ मिरवणूक आल्यानंतर तेजराज पाटील हे पोटास बांधलेल्या श्री खंडोबा व म्हाळसा या देवतांच्या मुखवट्यासह फुलांनी सजवलेल्या ओपन जीप या वाहनात ४.३० वाजता विराजमान झाले.

  त्यानंतर मुख्य मिरवणुकीस प्रारंभ झाला. यावेळी उपस्थित नागरिकांनी ‘येळकोट येळकोट…जय मल्हार, सदानंदाचा येळकोट..’चा गजर भंडारा खोबर्याची उधळन केली. या मिरवणुकीत गावातील सासनकाठ्या, मानाचा  गाडा, फुलांनी सजवलेल्या छत्र्या सहभागी झाल्या होत्या. सायंकाळच्या सुमारास मिरवणूक विवाह मंडपात पोहोचली. मानकऱ्यांनी देवास बोहल्यावर चढविल्यानंतर पारंपारिक पध्दतीने सायंकाळी ५.४० या गोरज मुहूर्तावर श्री खंडोबा व म्हाळसाचा विवाहसोहळा विधीवत पार पडला.

  पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात

  कोरोना महामारीच्या अनुषंगाने प्रशासनाने घातलेल्या निर्बंधांमुळे तारळी नदीपात्रात दरवर्षी खचाखच भरणारी यात्रा वाळवंटात मोकळी दिसून आली. यात्रा शांततेत व प्रशासनाच्या नियमांचे पालन करून यशस्वीपणे पार पाडण्यासाठी देवस्थान ट्रस्ट, यात्रा कमिटी, ग्रामपंचायत व उंब्रज पोलीस ठाणे आणि आरोग्य विभाग सतर्क राहिला होता. यात्रा काळात कोणतीही अनूचित घटना घडू नये, याकरिता उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. रणजीत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उंब्रजचे सपोनि अजय गोरड यांच्यासह १० पोलिस अधिकारी, ७९ पोलिस कर्मचारी तसेच स्वयंस्फूर्तीने होमगार्ड बंदोबस्तात सहभागी झाले होते.