‘निपाह’बाबत नवी माहिती समोर; संशोधक गायकवाड म्हणतात…

    महाबळेश्वर : येथील जंगलातील दोन वटवाघळांमध्ये निपाह या घातक रोगाचे व्हायरस सापडल्याचा दावा पुणे येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरोलाॅजी या संस्थेच्या संशोधकांनी केलाच नाही, असा दावा संशोधक महेश गायकवाड यांनी हिरडा विश्रामगृहावर पत्रकारांशी बोलताना केला. महाबळेश्वर येथील नागरिक व पर्यटकांनी घाबरू नये, असे आवाहनही महेश गायकवाड यांनी केले.

    महाबळेश्वरच्या जंगलातील राॅबर्स केव्ह या गुहेमधील दोन वटवाघळांमध्ये निपाह या रोगाचे व्हायरस सापडल्याचा दावा करून माध्यमांमध्ये वृत्त प्रसारित झाले होते. या वृत्तात पुणे येथील एनआयव्ही या संस्थेच्या संशोधकांचा हवाला देण्यात आला होता. हे प्रसिध्द झाल्याने महाबळेश्वरच्या सहलीवर येत असलेल्या पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. या पार्श्वभूमीवर संशोधक महेश गायकवाड यांनी महाबळेश्वरच्या जंगलातील राॅबर्स केव्ह या गुहेला भेट देऊन पाहणी केली. या पाहणीनंतर त्यांनी खास येथील हिरडा विश्रामगृहावर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाबळेश्वरच्या जंगलातील वटवाघळांमध्ये निपाह व्हायरस सापडलाच नाही असा दावा केला.

    बेसाॅल्ट या खडकापासून ही गुहा तयार झाली. ही गुहा आतमध्ये साधारण एक किमी लांब आहे. १९३६ साली ब्रेसेट या संशोधकाने या ठिकाणी संशोधन केले होते. त्यावेळी दोन वटवाघळांच्या जाती येथे होत्या. सध्या या ठिकाणी सहा जातींची वटवाघळे येथे आहेत. यापैकी एक जात ही दुर्मिळ जात असून, या वटवाघाळांची मदर काॅलनी येथेच पाहावयास मिळते. येथील सहा वटवाघळांच्या जातींपैकी एक जात ही फलाहारी आहेत. तर उरलेल्या पाच जाती या कीटकभक्षी आहेत.

    फलाहारी वटवाघळांची संख्या एक लाखपेक्षा अधिक असून बाकी इतर जातीची आहेत. ही सर्व वटवाघळे दिवसा गुहेत राहतात व सायंकाळी ते बाहेर पडतात. रात्रभर ते बाहेरच असतात. या काळात वटवाघळे ही फळांच्या बिया एका जागेवरून दुसरीकडे घेऊन जाण्याचे काम करतात. वटवाघळांमुळेच महाबळेश्वरच सदाहरीत जंगल आजपर्यंत शाबूत आहे. त्यामुळे महाबळेश्वरच्या निसर्गात वटवाघळांचा मोलाचा वाटा असून, ही वटवाघळे हे महाबळेश्वरचे वैभव आहे म्हटले तर वावगे होणार नाही, असे महेश गायकवाड यांनी सांगितले.