राष्ट्रवादीच्या स्वराज्य ध्वजाचे कराडमध्ये जल्लोषात स्वागत

महाराष्ट्राच्या तेजोमय इतिहासाचा वारसा सांगणाऱ्या स्वराज्य ध्वजाचे राज्यात ठिकठिकाणी जोषपूर्ण प्रतिसादात स्वागत होत आहे. प्रवासातील खराब हवामान, मुसळधार पाऊस, वाहतूकीतील अडचणी इत्यादी अडथळ्यांची पर्वा न करता वाटचाल सुरू ठेवत या ध्वज पूजन मोहिमेचा यशस्वी प्रवास सुरू आहे. राज्याबाहेरील तीन राज्यांमध्ये देखील ही ध्वज यात्रा पोहोचली आहे.

  कराड : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांची संकल्पना आणि आयोजनातून सिद्ध झालेली स्वराज्य ध्वज यात्रा दिवसेंदिवस यशस्वी वाटचाल करते आहे. स्वराज्य ध्वजाच्या निमित्ताने पुन्हा एकदा राज्यातील युवावर्गाला प्रेरणास्थान मिळालं असून स्वराज्य ध्वजगीताच्या तालावर अवघा महाराष्ट्र डोलत आहे. महाराष्ट्राची वीररसंपूर्ण गौरवशाली परंपरा देशभर पोहोचवण्यासाठी गेले पंधरा दिवस सातत्याने स्वराज्य ध्वज मोहिमचे वाहन राज्यातील सर्व जिल्हयात तसेच देशातील इतर राज्यांत फिरत आहे. ध्वज यात्रेच्या कराड मुक्कामात कराडवासीयांनी मोठ्या उत्साहात स्वराज्य ध्वजाचे स्वागत केले.

  येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ तसंच स्व. यशवंतराव चव्हाणसाहेब यांच्या समाधी स्थळी ‘स्वराज्य ध्वज’ नेण्यात आला. स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि भगिनी यांनी यावेळी ध्वजाची पूजा करून या प्रेरणादायी उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. यावेळी कराड पालिकेचे विरोधीपक्षनेते सौरभ पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस युवक प्रदेश सचिव निखिल शिंदे, नंदकुमार बटाणे, गंगाधर जाधव, सादिक इनामदार, समीर कुडची, नवाज शेख उपस्थित होते.

  महाराष्ट्राच्या तेजोमय इतिहासाचा वारसा सांगणाऱ्या स्वराज्य ध्वजाचे राज्यात ठिकठिकाणी जोषपूर्ण प्रतिसादात स्वागत होत आहे. प्रवासातील खराब हवामान, मुसळधार पाऊस, वाहतूकीतील अडचणी इत्यादी अडथळ्यांची पर्वा न करता वाटचाल सुरू ठेवत या ध्वज पूजन मोहिमेचा यशस्वी प्रवास सुरू आहे. राज्याबाहेरील तीन राज्यांमध्ये देखील ही ध्वज यात्रा पोहोचली आहे.

  दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर १५ ऑक्टोबर रोजी या स्वराज्य ध्वजाची प्रतिष्ठापना होत असून तत्पूर्वी महाराष्ट्रातील राजर्षी शाहू-ज्योतिबा फुले-डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक, प्रमुख देवस्थानांसह देशातील प्रमुख संतपीठे, शौर्यपीठे आणि धार्मिक पीठे तसेच श्रीराम मंदिर (अयोध्या), मथुरा-वृंदावन, केदारनाथ(उत्तराखंड), आग्रा किल्ला, अजमेर शरीफ दर्गा(राजस्थान), महाराज श्रीमंत सयाजीराव खंडेराव गायकवाड(तिसरे), बडोदा संस्थानचे अधिपती, गुजरात अशा ७४ वंदनीय ठिकाणी नेऊन या ध्वजाचे पूजन होत आहे. या सर्वसमावेशक ध्वजाचे सर्वांनीच प्रातिनिधिक पूजन करावे, ही या प्रवासामागील लोकभावना आहे. त्यासाठी राज्यातील ३६ जिल्हे आणि सहा राज्यांसह १२ हजार कि.मी असा सलग ३७ दिवस या ध्वजाचा प्रवास होईल. त्यानंतर अहमदनगर जिल्ह्यातील शिवपट्टण किल्ल्यावर मान्यवरांच्या उपस्थितीत या प्रेरणादायी ध्वजाची मानाने प्रतिष्ठापना होणार आहे.

  जिल्ह्यातून चांगला प्रतिसाद
  आजपर्यंत स्वराज्य ध्वज रथ अडचणींची पर्वा न करता प्रवास करत आहे. राज्यातील प्रवासाचा हा अखेरचा व तिसरा टप्पा सुरू आहे. गेले दोन आठवडे कोविड साथरोगाच्या काळातही कोविडसंबंधीचे सर्व आवश्यक नियम पाळून अत्यंत नियोजनबद्ध रितीने स्वराज्य ध्वज मोहिम राज्यातील सर्व जिल्ह्यांमधून महत्त्वाकांक्षी प्रवास करत आहे. सर्व जिल्ह्यांमधून स्वराज्य ध्वजाला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.

  शक्ती, निष्ठा, संयम, प्रगती, त्याग, संघर्ष व समतेचे प्रतीक असलेल्या स्वराज्य ध्वजाने राज्यातील अनेक शहरांमध्ये पोहोचून तिथल्या स्थानिकांमध्ये चैतन्य निर्माण करण्याचा वसा घेतलेला आहे. स्वराज्य ध्वजाच्या या प्रवास मोहिमेला समाजातील सर्वच थरांमधून उत्फुल्ल प्रतिसाद मिळत आहे. कराडकर वासीयांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या या स्वराज्य ध्वजाला अभिवादन करून स्फूर्तीमय अनुभव घेतला आहे.

  -सौरभ पाटील ,कराड