राष्ट्रवादी सन्मानानेच निवडणूक लढवणार : सभापती रामराजे नाईक निंबाळकर

    दहिवडी : कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक वाटते तेवढी सोपी नाही. जिंकायच्या दृष्टीने काय करावं लागेल अन् वारं कुठं वाहतंय याचा अंदाज घेण्यासाठी मी माण तालुक्यात आलो आहे, असे विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले.

    दहिवडी येथे बाजार समिती निवडणुकीच्या अनुषंगाने आयोजित राष्ट्रवादीच्या संवाद बैठकीत ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख, मनोज पोळ, तालुकाध्यक्ष बाळासाहेब सावंत, उपसभापती तानाजी कट्टे, ,चेअरमन सुनिल पोळ, कविता म्हेत्रे, युवराज सुर्यवंशी, श्रीराम पाटील, विनय पोळ, ख वि. संघाचे चेअरमन बाबूराव काटकर, अभयसिंह जगताप, गोंदवले बुद्रुकचे सरपंच जयप्रकाश कट्टे आदी मान्यवर उपस्थित होते.

    रामराजे पुढे म्हणाले, पुढील विधानसभेला तोंड देण्यासाठी सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आपल्या ताब्यात असल्या पाहिजेत. त्यामुळे राजकारणात आपलं मूळ पक्कं करण्याच्या या निवडणुका आहेत. ही मर्यादित मतांची निवडणूक वाटते तेवढी सोपी नाही. लोकांना गृहीत धरुन चालणार नाही. कारण माणच्या जनतेच्या मनात काय आहे, हे सहजासहजी समजत नाही. अत्यंत सावध पावलं टाकून ही निवडणूक लढवावी लागेल. निवडणूक जिंकण्यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला मान खाली घालावी लागेल, अशी तडजोड होणार नाही.

    भाजप आपला नंबर एकचा शत्रू 

    जिल्हाध्यक्ष सुनील माने म्हणाले, तात्यांनी सामान्य कार्यकर्ता सत्तेत असला पाहिजे यासाठी त्याला नेहमीच ताकद दिली. राजकारणात सत्तेच्या समीकरणापेक्षा कार्यकर्त्यांचं बळ महत्वाचं असतं. अन् ते राष्ट्रवादीकडे आहे. आपला नंबर एकचा शत्रू भाजप आहे, हे बघून ‘आमचं ठरलंय’ टीमला बरोबर घेवून जाण्याची भूमिका आपली असली पाहिजे. पण त्याचवेळी आपल्या कार्यकर्त्यांचा सन्मान कमी होणार नाही, याची आपण दक्षता घेणार आहोत. राष्ट्रवादीच्या विचाराची पाठराखण करणाऱ्या कार्यकर्त्यांना आपण संधी देणार आहोत. पक्षाचे काम न करता नेत्यांच्या कानाला लागणाऱ्या कार्यकर्त्यांचे लाड यापुढे पुरविले जाणार नाहीत.

    बाजार समितीची निवडणूक जिंकणारच

    प्रभाकर देशमुख म्हणाले, बाजार समितीची निवडणूक फक्त लढण्यासाठी नव्हे तर जिंकण्यासाठी लढणार आहोत. त्यासाठी जे करावे लागेल ते करायची आपली तयारी आहे. आपण एकत्र असलो तर विजय निश्चित आहे याची प्रचिती ग्रामपंचायत निवडणुकीत आपण घेतली आहे. निवडणुकीला सामोरे जात असताना लढणाऱ्या कार्यकर्त्याला बळ देण्याची भूमिका आपण सर्वांनीच घेतली पाहिजे. या निवडणुकीबाबत वरिष्ठ जो निर्णय घेतील तो आम्हा सर्वांना मान्य असेल.

    यावेळी श्रीराम पाटील, अंगराज कट्टे, चव्हाण गुरुजी, सूर्याजी जगदाळे, विजय जगताप, संजय जगताप, दादासाहेब चोपडे यांनी कार्यकर्त्यांच्यावतीने आपली मते मांडली.